महिला संतापल्या; म्हणाल्या, अनुदान कधी देता ते सांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 10:31 AM2021-07-06T10:31:03+5:302021-07-06T10:31:11+5:30
Akola Municipal Corporation News : महापालिकेने आखडता हात घेतल्यामुळे संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक १८ मधील महिलांनी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे धाव घेतली.
अकाेला : पंतप्रधान आवास याेजनेअंतर्गत शिवसेना वसाहतमध्ये पात्र लाभार्थ्यांना घरे मंजूर केली. घर बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर आता उर्वरित हप्ते देण्यास महापालिकेने आखडता हात घेतल्यामुळे संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक १८ मधील महिलांनी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे धाव घेतली. आयुक्तांच्या दालनात संतापलेल्या महिलांनी अनुदान कधी देता ते सांगा, अशी मागणी करीत आयुक्तांसाेबत चांगलीच बाचाबाची केली. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांचीही आयुक्तांसाेबत जाेरदार खडाजंगी झाल्याने पाेलिसांना पाचारण करावे लागले. मनपाच्या बांधकाम विभागाकडून ‘पीएम आवास’ याेजनेतील पात्र लाभार्थ्यांसह प्रशासनाची सातत्याने दिशाभूल केली जात आहे. त्यात भरीस भर नगररचना विभागाकडून लाभार्थ्यांना लीजपट्टा देण्यास कुचराई केली जात असल्याने लाभार्थी वैतागले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मागील काही दिवसांपासून घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पुढील हप्ते जमा करण्यास आखडता हात घेतल्याने लाभार्थ्यांची घरे अर्धवट आहेत. यामुळे गरीब लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ ओढवली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना वसाहतमधील वैतागलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरसेविका सपना नवले, मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, शशीकांत चाेपडे, अश्विन नवले यांनी असंख्य महिला व पुरुषांसह मनपात ‘डेरा आंदाेलन’ छेडले. प्रशासनाने या समस्येवर मार्ग काढावा, अशी मागणी नगरसेवकांसह लाभार्थ्यांनी केली असता आयुक्त निमा अराेरा यांनी ही सूचना बेदखल केली.
प्रवेशद्वाराचे कुलूप ताेडले!
अनुदानाचे हप्ते थांबल्याने वैतागलेले लाभार्थी मनपात धडकणार, याची कुणकुण लागलेल्या प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले. महिलांचा संताप लक्षात घेता सेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप ताेडून महिलांना प्रवेश दिला.
लाभार्थ्यांना कधी भेटायचे, हा माझा प्रश्न?
मनपा आवारात उन्हात ताटकळत बसलेल्या महिलांची समस्या कशी निकाली काढता, याचा खुलासा करण्याची मागणी सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केली असता लाभार्थ्यांना कधी भेटायचे, हा माझा वैयक्तिक प्रश्न असल्याचे आयुक्त म्हणाल्या. त्यावर सर्व महिलांना आयुक्तांच्या दालनात बाेलावण्याची सूचना मिश्रा यांनी केली असता उपस्थित पाेलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांसाेबत महिलांची झटापट झाली.
पाेलीस बंदाेबस्तात आयुक्त रवाना!
महिलांचा संताप लक्षात घेता सिटी काेतवाली पाेलिसांना पाचारण करावे लागले. पाेलीस बंदाेबस्तात आयुक्त अराेरा दालनाबाहेर निघाल्या. याप्रकरणी पाेलिसांत तक्रार करण्याच्या हालचाली सुरू हाेत्या.