दगड कोसळल्याने महिला मजूर ठार
By admin | Published: March 4, 2017 02:36 AM2017-03-04T02:36:21+5:302017-03-04T02:36:21+5:30
बोरगाव मंजू येथील गिट्टी खदानमधील घटना.
बोरगाव मंजू (जि. अकोला), दि. ३- स्थानिक गिट्टी खदानवर काम करणार्या ५0 वर्षीय महिला मजुराचा डोक्यावर दगड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामजी नगरस्थित मनसुराबी सै.ताहेर अली या तापडिया यांच्या गिट्टी खदानवर मजूर म्हणून कामावर होत्या. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजता हॉपरमध्ये एका टिप्परमधील दगड टाकत असताना अंदाजे ५0 ते ६0 किलो वजनाचा दगड मनसुराबी यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व घटनास्थळावरच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार काटकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अशोक गवई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृतक महिलेची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एक मुलगा व पती असे त्यांचे कुटुंब असून, दररोज कामावर गेल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरत नाही. त्यामुळे या महिलेला अशा धोक्याच्या ठिकाणी काम करावे लागत असे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी होत आहे.