महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
By admin | Published: April 6, 2017 08:45 PM2017-04-06T20:45:29+5:302017-04-06T20:45:29+5:30
अकोला- महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: वाढीव पगाराची थकबाकी देण्यासाठी घेतली लाच
अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. तिच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
तक्रारकर्ता हा महान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चालक पदावर कार्यरत आहे. चालकाच्या वाढीव पगाराची थकबाकी देणे शिल्लक आहे. त्यामुळे चालकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिच्याकडे वाढीव पगाराची थकबाकी देण्याची मागणी केली; परंतु डॉ. शिरभाते थकबाकी देण्यास सातत्याने टाळाटाळ करीत होती. चालकाने वारंवार मागणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरभाते हिने चालकाकडे बारा हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याचे निश्चित झाल्यावर चालकाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये सापळा लावण्यात आला. चालकाने बारा हजाराची रक्कम आणल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिने लाच स्वीकारली. लाच घेताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला रंगेहात अटक केली. तिच्यावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरभाते हिला न्यायालयात हजर करण्यात येईल.
वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
महान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिच्या वर्तणुकीबद्दल तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉ. शिरभाते ही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक द्यायची, टाकून बोलायची; त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी, परिचारिकांनी तिच्याबद्दल तक्रारी केल्या. पैसे घेतल्याशिवाय ती कर्मचाऱ्यांचीसुद्धा कामे करीत नसे.