रामनगर, खापरखेड येथील महिलांची पाण्यासाठी पंचायत समितीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:18 AM2021-04-13T04:18:03+5:302021-04-13T04:18:03+5:30
पातूर : तालुक्यातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांची पाण्यासाठी ...
पातूर : तालुक्यातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी सोमवारी (दि.१२) पंचायत समिती कार्यालयात धडक घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला घेराव घातला.
तालुक्यातील ग्रामपंचायत शेकापूर अंतर्गत असलेल्या गट ग्रामपंचायत रामनगर, खापरखेडा हे अकोला जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांचे गाव आहे. त्यांच्याच गावातील महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी जावे लागत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. रामनगर, खापरखेडा येथे महिलांना दूरवरून विहिरीतून पाणी आणण्याची वेळ आल्याने मोलमजुरी सोडून महिलांना घरी राहावे लागत आहे. तसेच गुरांच्या पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. पंचायत समितीमध्ये मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती दाभाडे यांच्या नेतृत्वात महिलांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दिनेश मांगुळकर यांना घेराव घालून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी करीत निवेदन दिले. निवेदनावर पुष्पा पुरुषोत्तम शिरसाट, सुनीता गणेश राठोड, इंदूबाई बाळू पवार, उषाबाई संजय राठोड, अलकाबाई सदाशिव राठोड, किरण मंगेश राठोड, केसरबाई संतोष चव्हाण, माया राठोड, वर्षा अंकुश चव्हाण, रेखा कनीराम चव्हाण, अमिता राम राठोड, मंजुळाबाई दिलीप चव्हाण, मोनिका अनिल राठोड, कविता कैलास पवार आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जांभरून येथेही तीव्र पाणीटंचाई
बाभूळगाव ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जांभरून येथेही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी पातूर पंचायत समितीत धाव घेऊन निवेदन दिले आहे. पातूर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी पदाचा प्रभार विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांच्याकडे आहे. ते सुटीवर असल्यामुळे अकोटचे गटविकास अधिकारी ओ.टी. गाठेकर यांच्याकडे प्रभार दोन दिवसांपूर्वी देण्यात आला. त्यांना अकोट सांभाळून पातूरला येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पातूर पंचायत समितीतील कामे थंडावली आहेत.
--------------------------------------------
शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत पाणीटंचाई निर्माण झाली आहे; मात्र काही जण राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. लवकरच उपाययोजना करून गावातील पाणीटंचाई दूर करण्यात येईल.
-सावित्रीबाई हिरासिंग राठोड, जि.प. उपाध्यक्ष, अकोला