सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणार महिला बचत गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:42 PM2019-09-20T13:42:47+5:302019-09-20T13:43:02+5:30

ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन्सचा निर्मिती उद्योग केला जाणार आहे.

Women Savings Group to manufacture sanitary napkins | सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणार महिला बचत गट

सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणार महिला बचत गट

googlenewsNext

अकोला : महिलांना स्वच्छतेसाठी स्थानिक स्तरावर उत्पादित केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती अकोला जिल्ह्यातच करण्याचा उपक्रम सुरू होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १४ महिला बचत गटांची निवड करण्यात आली. त्या गटाचा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा परिषदेचे अनुदान व बँकांचे कर्ज दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी दिली. यावेळी आमदार बळीराम सिरस्कार, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, राजेंद्र फडके, कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
किशोरवयीन मुली, महिलांना रजोवृत्तीच्या काळात स्वच्छतेची समस्या निर्माण होते. ग्रामीण भागात ही समस्या अनेक रोगांना आमंत्रण देणारी ठरते. त्यातून महिला, मुलींची सुटका करण्यासाठी शासनाने आधीच ‘अस्मिता’ नावाने कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. आता जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी त्यातून उपलब्ध केली जात आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादनाचाही त्याला हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन्सचा निर्मिती उद्योग केला जाणार आहे. जिल्हा परिषदेने त्यासाठी अनुदानित रक्कम म्हणून १ लाख २० हजार रुपये ठरविली आहे. प्रकल्प किमतीमध्ये अनुदानाची रक्कम, बचत गटाचा हिस्सा व बँकेचे कर्ज मिळून रक्कम उभारली जाईल. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देणार आहेत, अशी माहितीही आयुष प्रसाद यांनी दिली.
- १४ बचत गटांची निवड
जिल्हा परिषदेकडून हा उद्योग उभारणीसाठी बचत गटांचे अर्ज मागविण्यात आले. त्या अर्जातून प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे गटांची निवड करण्यात आली. त्यामध्ये निकषानुसार माविम, ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोंदणीकृत गटांची निवड झाली. या गटांकडून निर्मिती केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा स्थानिक वापर सुरू झाल्यानंतर इतरही जिल्ह्यात पाठविण्याची तयारी केली जाईल, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
- पाच गटांकडे मार्केटिंग
निर्मिती करणाऱ्या बचत गटासोबत पाच महिला बचत गट जोडले जाणार आहेत. त्या गटातील महिला सॅनिटरी नॅपकिन्सची मार्केटिंग तसेच पुरवठ्याबाबतची कामे पाहणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title: Women Savings Group to manufacture sanitary napkins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.