दिसायला सुंदर नाही म्हणत, उपाशी ठेऊन करायचे छळ!
By नितिन गव्हाळे | Published: August 29, 2023 09:35 PM2023-08-29T21:35:14+5:302023-08-29T21:35:22+5:30
विवाहितेच्या तक्रारीनुसार पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
अकोला: दिसायला सुंदर नाही, आमच्या मुलाला शोभत नाही. असे सासू-सासरे म्हणायचे आणि पती भडकवून द्यायचे. त्यामुळे पतीसुद्धा गतीमंद मुलीला जन्म दिला. असे म्हणत, घरात कोंडून दोन-दोन दिवस उपाशी ठेऊन छळ करायचे अशा विवाहितेच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी पतीसह सासू-सासरे, जेठ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
बसेरा कॉलनी मलकापूर येथील ३६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा विवाह रिसोड येथील एकता नगरातील संदीप प्रकाश देवाजे(३९) याच्यासोबत २०१२ मध्ये झाला. विवाहात आईने तीन लाख रूपये हुंडा, सोन्याचा गोफ व अंगठी दिली होती. लग्नानंतर पती संदीप, सासु-सासर प्रकाश दौलतराव देवाजे, सासू सुलोचना यांनी विवाहितेचे घराबाहेर निघणे बंद केले होते. सासू नेहमी खोटे आळ घेवून पतीला भडकवायची. त्यामुळे विवाहितेचे पती शिवीगाळ करून मारहाण करायचे आणि दोन-दोन दिवस उपाशी ठेवायचे.
सासू- सासरे, जेठ समाधान देवाजे हे विवाहितेला म्हणायचे की तु दिसायला सुंदर नाही, आमच्या मुलाला शोभत नाही असे म्हणत, मानसिक त्रास द्यायचे. जेठ समाधान देवाजे हे पतीला फोनवर बायकोला सोडून दे, दूसरे लग्न लावून देतो. असे बोलायचे. विवाहितेच्या तक्रारीनुसार भरोसा सेल पोलिसांनी दोन्ही कुटूंबामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु तडजोड झाली नाही. अखेर खदान पोलिसांनी पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.