लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वुमेन वारियर्स ऑन ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:38 AM2021-05-31T11:38:22+5:302021-05-31T11:38:47+5:30
Akola Police News : महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लेकरांना घरी ठेवून रात्रंदिवस ड्युटी बजावत असल्याचे वास्तव आहे.
अकोला : कोरोनाचे संकट एक वर्षापासून आहे. यासोबतच रात्रीचा बंदोबस्त, रात्रगस्त आणि संचारबंदीच्या ड्युटीसाठी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लेकरांना घरी ठेवून रात्रंदिवस ड्युटी बजावत असल्याचे वास्तव आहे. या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वुमेन वारियर्स असून, लेकरांची काळजी वारंवार फोन करूनच घेत असल्याचेही त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर आले आहे.
अकोला जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये १७ महिला पोलीस अधिकारी कार्यरत असून, सुमारे ३३३ महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी देण्यात येत आहे. त्यांच्या ड्युटी नियमांमध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी करणे अनिवार्य असल्याने या पोलीस अधिकारी व कर्मचारी लेकरांना घरी ठेवून रात्रीची ड्युटी प्रामाणिकपणे बजावत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस दलातील या वुमेन वारियर्सना ज्याप्रमाणे ड्युटी फर्स्ट ही काळजी आहे, तेवढीच काळजी कुटुंबातील सदस्याची असल्याचे त्यांनी सांगितले. या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आधी ड्युटी योग्यरीत्या बजावतात आणि नंतरच कुटुंब व लेकरांचीही तेवढीच काळजी करीत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ड्युटीवर असतानाही मुलांची काळजी घेण्यासाठी त्या तत्पर असल्याचे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. रात्रीची ड्युटी बजावत असताना मुलेही सुरक्षित आहेत का याचाही आढावा या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी घेतात.
एकूण पोलीस अधिकारी ११२
महिला पोलीस अधिकारी १७
एकूण पोलीस २३२५
महिला पोलीस ३३३
कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच
वूमेन वारियर्स रात्रीची ड्युटी करीत असताना कुटुंबातील सदस्यांची काळजी मोबाईलवर संवाद साधून घेत आहेत. रात्रीतून दोन ते तीन वेळा घरी फोन करून त्या मुलांची व घरातील ज्येष्ठांची काळजी घेतात. काही महत्त्वाचे असेल तर मैत्रिणींची मदतही घेत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ड्युटी करणे गौरवाचे कार्य आहे. एक महिला पोलीस असतानाही आपण कुटुंबासोबतच नागरिकांच्या मनातही सुरक्षित भावना निर्माण करीत आहोत, ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.
-गंगासागर कराळे
महिला पोलीस कर्मचारी,
दंगा नियंत्रण पथक
पोलीस दलात दाखल होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पोलीस अधिकारी असो किंवा कर्मचारी ड्युटी बजावणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम आहे आणि आव्हाने स्वीकारण्याची सवय लहानपणापासूनच असल्याने आता ड्युटी करताना एक वेगळा आनंद मिळतो.
-सपना अटकलवार
महिला पोलीस कर्मचारी
दंगा नियंत्रण पथक
पोलिसांच्या ड्युटीला काही वेळ नाही. घटना घडल्यानंतर किती दिवस त्या ठिकाणी ड्युटी बजावावी लागेल हे सांगता येत नाही. सुरुवातीला या बाबीचा त्रास झाला; मात्र आता पोलिसाची ड्युटी कितीही वेळ करण्याची सवय झालेली आहे आणि सुरक्षिततेसाठी ड्युटी करीत असल्याचे मोठे समाधान मनाला आहे.
-चंचल बैस
महिला पोलीस कर्मचारी
दंगा नियंत्रण पथक
सण उत्सवामध्ये आई घरी नसल्याचे अनेकदा आम्ही अनुभव घेतले आहेत. त्यामुळे मोठा सण उत्सव असताना आई घरी नसणे म्हणजे मोठी दुःखाची बाब आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमची आई रस्त्यावर बंदोबस्तात उभी आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
-ओवी पावडे
खून, चोरी, महिलांवरील अत्याचार यासारख्या घटना घडल्यानंतर आमची आई तपास करते. त्या पीडित महिलांना न्याय देण्याचे काम करते. पोलीस ड्युटी बजावताना रात्रंदिवस कार्यरत असते. हे आमच्यासाठी प्रेरणादायी असून, आमच्या आयुष्याला एक चांगले वळण देण्यासाठी खूप मोठी प्रेरणा आमच्या आईकडूनच मिळत आहे.
- वेदांत इंगळे
आईची रात्री ड्युटी असताना खूप काळजी वाटायची. काही वेळा तर रात्रीला झोपही यायची नाही. लहानपणापासून आईची सवय असल्यामुळे आई बाहेर जाताच झोपेतून जाग यायची. आई मोबाईलवरून संभाषण करून धीर द्यायची; मात्र आता आई ड्युटीवर असल्याचे समाधान आहे आणि आम्हालाही सवय झाली आहे.
- आरुषी गीते
पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित आहे. कोरोनाचे भीषण संकट असल्याने प्रत्येकाने नियम पाळावे. स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांना दूर ठेवून रस्त्यावर तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांविषयी आदराची भूमिका ठेवावी.
- जी श्रीधर
पोलीस अधीक्षक, अकोला