सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला बेड अभावी ठेवलं जमिनीवर

By Atul.jaiswal | Published: August 27, 2021 11:29 AM2021-08-27T11:29:32+5:302021-08-27T12:07:15+5:30

सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार; वार्ड क्र. २ मध्ये गर्भवतींना बेड मिळेना

women who gave birth to child through cesarean delivery kept on floor in akola | सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला बेड अभावी ठेवलं जमिनीवर

सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला बेड अभावी ठेवलं जमिनीवर

googlenewsNext

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या वार्ड क्र. २ मध्ये बेडअभावी सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला चक्क दोन वेळा जमिनीवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर गुरुवारी आला आहे. कळस म्हणजे गादी पुरवण्यासही रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्यामुळे या महिलेस सोबत आणलेल्या चादरीवर झोपावे लागले. नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर या महिलेस बेड मिळाला. तथापी, या वार्डात अजुनही अनेक महिलांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.

अकोला जिल्ह्यातील माहेर असलेल्या खामगावच्या एका गर्भवती महिलेस तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. शनिवारीच सिझेरियनद्वारे प्रसुती झाल्यानंतर या महिलेस वार्ड क्र. २ मध्ये बेड देण्यात आला. एक दिवस उलटल्यानंतर सोमवारी नवीन रुग्ण आल्यामुळे या महिलेस बेड रिकामा करण्यास सांगण्यात आले. नाइलाज असल्याने महिला व तिच्या आईने बेड रिकामा करताना किमान गादी तरी द्यावी, अशी मागणी केली. परंतु, कक्षात कार्यरत कर्मचार्यांनी गादीही देऊ शकत नसल्याचे सांगितल्याने शेवट सोबत आणलेल्या चादरीवरच ओल्या बाळंतीनीला झोपावे लागले. काही तासानंतर या महिलेस बेड देण्यात आला. बुधवारी सकाळी पुन्हा बेड रिकामा करण्यास सांगण्यात आला. बुधवारचा दिवस व पूर्ण रात्र या महिलेने जमीनीवरच काढली. गुरुवारी सकाळी या महिलेस बेड देण्यात आला.

अनेक महिला जमिनीवरच
महिलेच्या भावाने याबाबत रुग्णसेवक संघटनेला कळविल्यानंतर जिल्हाध्यक्ष आशीष सावळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला व बेड देण्याची विनंती केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी या महिलेला बेड मिळाला. आशिष सावळे यांनी गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन तक्रारही केली आहे. अजुनही अनेक महिला जमीनीवरच ठेवण्यात आले आहे. या वार्डची क्षमता वाढविण्याची विनंती सावळे यांनी केली आहे.

क्षमता ३० गर्भवती महिला ६० पेक्षा अधिक
गर्भवती महिलांसाठी असलेल्या वार्ड क्र. २ ची क्षमता केवळ ३० बेडची आहे. सद्या सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिला दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून, या वार्डात ६० पेक्षाही अधिक गर्भवती महिला दाखल आहेत. त्यामुळे अनेक महिलांना जमीनीवर ठेवण्यात आले आहे. दुसरा वार्ड नसल्याने नाईलाजाने हा पर्याय स्वीकारण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गत काही दिवसांपासून गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वार्डात गर्दी वाढली आहे. उपाययोजना करण्यात येत आहेत.

- मिनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

Web Title: women who gave birth to child through cesarean delivery kept on floor in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.