महिला बचत गटांतील महिलांची उद्योगात भरारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:20+5:302021-04-04T04:19:20+5:30
मूर्तिजापूर: शहरातील अल्प उत्पन्न गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचावण्याकरिता नगरपरिषदेमार्फत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ...
मूर्तिजापूर: शहरातील अल्प उत्पन्न गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचावण्याकरिता नगरपरिषदेमार्फत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे बचत गट, वस्ती स्तर संघ स्थापन करून, त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांनी विविध उद्योग स्थापन करून भरारी घेतली आहे.
शहरात १८५ बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात स्वयंरोजगार कार्यक्रम या घटकांतर्गत २९ बचत गटांना ३८ लाख ३० हजार व स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत १७ वैयक्तिक पुरुष व महिला लाभार्थ्यांना २० लाख ४६ हजार इतके कर्ज राष्ट्रीयकृत बँकामार्फत व्यवसाय करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये विविध बॅंकांचे सहकार्य मिळत आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता धोरण पी.एम. स्वनिधी अंतर्गत २३५ पथविक्रेत्यांना दहा हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अभियानाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी दिली. अभियानाचे शंभर टक्के उद्दिष्टपूर्तता करण्यासाठी मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, उपनगराध्यक्ष सुनील पवार, महिला बालकल्याण सभापती प्रतीक्षा मोहन वसूकार व सर्व नगरसेवक यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
बचत गटांचे माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले असून, त्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावित आहेत. महिलांनी जास्तीतजास्त कुटीर गृहउद्योग व्यवसाय उभारणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बचत गटांचे स्थापनेसाठी समुदाय संघटिका रुबीना परवीन, शिल्पा बोकडे, राऊत, प्रतीक्षा मेश्राम आदी परिश्रम घेत आहेत.