दारू दुकानाविरुद्ध महिलांचा एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 08:38 PM2017-04-03T20:38:54+5:302017-04-03T20:38:54+5:30
पातूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या दारूच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.
परवानगी रद्द करण्याची मागणी
अकोला: पातूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या दारूच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.
राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील सर्व प्रकारची दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पृष्ठभूमीवर पातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील एका दारू दुकानाच्या मालकाने त्यांचे दुकान खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत बांधण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू केल्या. या परिसरात दारूचे दुकान होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी फेब्रुवारी महिन्यात रीतसर तक्रार केली होती; परंतु या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १ एप्रिलपासून या परिसरात देशी दारूचे दुकान सुरू झाले. कार्यालयावर मोर्चा आणला. दारू दुकानाचे काम सुरू असलेल्या परिसरात गुरुकुल कॉन्व्हेंट, हनुमान मंदिर, नियोजित एज्यूविला पब्लिक स्कूल आहे. या परिसरात दुकान सुरू झाल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील दारू दुकानाची परवानगी रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी प्रवीण प्रल्हाद इंगळे यांच्यासह ढोणे नगर, सम्यक कॉलनी, समता नगर या परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.