राष्ट्रनिर्मितीत महिलांचे मोलाचे योगदान - जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:20 AM2018-03-29T02:20:40+5:302018-03-29T02:20:40+5:30
अकोला : राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये महिलांचे नेतृत्व, कर्तृत्व सिद्ध होत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे जात आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबावर संस्कार केल्यामुळे राज्याला छत्रपती राजा लाभला. मुलांवर संस्कार केवळ आईच करू शकते. त्यामुळे संस्कारक्षम पिढी निर्माण होऊन बलशाली राष्ट्राची उभारणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये महिलांचे नेतृत्व, कर्तृत्व सिद्ध होत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे जात आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबावर संस्कार केल्यामुळे राज्याला छत्रपती राजा लाभला. मुलांवर संस्कार केवळ आईच करू शकते. त्यामुळे संस्कारक्षम पिढी निर्माण होऊन बलशाली राष्ट्राची उभारणी होत आहे. या राष्ट्र निर्मितीतही पुरुषांएवढेच महिलांचेही मोलाचे योगदान आहे. असे मत नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार यांनी मांडले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने बुधवारी दुपारी स्व. डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय मेळाव्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. प्रमुख अतिथी म्हणून वाशिमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, डॉ. प्रकाश कडू उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी, प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करून आणि परिश्रमाने अनेक महिलांनी शेतीला उद्योगाची जोड देत कुटुंबाची प्रगती साधली. कृषी विद्यापीठातर्फेसुद्धा महिलांना उद्योगासाठी, शेतीपुरक व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्याचा महिलांनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी परिस्थितीवर मात करून शेतीपुरक व्यवसायासोबतच विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा लघुपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
कार्यक्रमामध्ये कवी अॅड. अनंत खेळकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. दिलीप मानकर यांनी केले. संचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्षा खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. नागदेवे, कृषी विज्ञान केंद्राचे उमेश ठाकरे उपस्थित होते.
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
वाशिम जिल्ह्यातील घाटा येथील तारामती प्रकाश दाभाडे, वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथील शोभा गायधने, अमरावती जिल्ह्यातील दाभा येथील मनिषा सचिन टवलारे, गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील सुशीला मोतीराम मडावी, अकोल्यातील मधुमती इंगळे, यवतमाळ येथील दीपाली शिरभाते, येवता जि. अकोला येथील प्रगती भारसाकळे, घुसर येथील सुरेखा अनिल घावट, शिवनीच्या मालती विनोद डोंगरे, भंडारा जिल्ह्यातील सोनपुरी येथील गोपिका जगन कठाने, गडचिरोलीच्या वीणा धात्रक, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील स्मिता गजानन राऊत, भंडारा जिल्ह्यातील खैरी सुकळी येथील मंदा गावळकर,अकोल्याच्या वंदना पिंपळखरे यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुरुषांएवढ्याच महिलाही सक्षम - मोक्षदा पाटील
वाशिमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी, महिला म्हणून कधीच दुय्यम स्थान घेऊ नका. आम्ही घर, कुटुंब, मुले आणि शेती, व्यवसाय, नोकरी सांभाळतो. त्यामुळे पुरुषांच्यापेक्षा आम्ही महिला सक्षम आहोत. त्यामुळे स्वत:विषयी अभिमान बाळगा. महिला जे करू शकते, ते पुरूष करू शकत नाही. शरीररचना वेगळी असली तरी आमची क्षमता सारखीच आहे. त्यामुळे घरात समानता आणली पाहिजे, अशा शब्दात मार्गदर्शन केले.