दारू दुकानाविरोधात महिलाशक्ती एकजूट!
By admin | Published: March 23, 2017 02:42 AM2017-03-23T02:42:28+5:302017-03-23T02:42:28+5:30
गायगावातील दुकान बंदची मागणी
गायगाव (अकोला), दि. २२- दारू दुकान दलित वस्तीजवळ नेण्याच्या मालकाच्या प्रयत्नाला महिला शक्तीने प्रखर विरोध करत शेकडो महिला २२ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात धडकल्या. दारूचे दुकान दलित वस्तीत न येऊ देता हे दुकान कायमचे बंद करावे अन्यथा आम्ही बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा महिलांनी यावेळी दिला.
सुधाकर थोटे यांचे अनेक वर्षांपासून गावात सरकारमान्य दारू दुकान आहे. गेल्या काही महिन्यापासून गावात मध्यभागी असलेले हे दुकान आता राज्य महामार्गापासून ५00 मीटर अंतरावर जाणार, अशी चर्चा गावात सुरू असताना सुधाकर थोटे यांनी काही दिवसांपूर्वी मोरगाव रोडवर दलित वस्तीजवळ मोठा खुला प्लॉट खरेदी केला. सोबतच त्या ठिकाणी बांधकाम आरंभिले. त्यामुळे हे दुकान दलित वस्तीत येणार म्हणून महिला शक्ती संतप्त होत सुमारे २00 महिलांनी दारू दुकानविरोधात ग्रामपंचायत कार्यालयात मोर्चा काढला. यावेळी सरपंच ऊर्मिला सुनील आगरकर यांना ३00 महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. यावेळी संतप्त महिलांनी दारू दुकान संदर्भात आपला रोष व्यक्त केला.
आमचा संसार दारूमुळे उद्ध्वस्त होऊन आमचे मुलांचे भविष्य खराब होत आहे. दुकान बंदसाठी आम्ही बेमुदत उपोषणाला बसू, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला. त्यामुळे हे प्रकरण आता कोणते वळण घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष्य लागले आहे.