गायगाव येथील दारू दुकानाविरुद्ध महिला शक्ती एकवटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:15+5:302021-06-02T04:16:15+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गायगाव येथील ८०० महिलांनी लेखी तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार सुधाकर वामनराव थोटे यांच्या ...
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गायगाव येथील ८०० महिलांनी लेखी तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार सुधाकर वामनराव थोटे यांच्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये गावाच्या मध्यभागी देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोर कायमच गर्दी असते. दारुडे व गुंड प्रवृत्तीचे तरुण सतत उभे असतात. त्यामुळे येथून नागरिक व महिलाची कुचंबणा होते. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. असेही निवेदनात म्हटले आहे. सोबतच गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून या मध्यभागी असलेल्या दारू दुकानाचा नागरिकांना त्रास होत आहे. दारूचे दुकान कायमचे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो:
ग्रामपंचायतने घेतला दारू दुकान बंद करण्याचा ठराव
गायगाव ग्रामपंचायतच्या २४ एप्रिल २०२१ च्या मासिक सभेत संबंधित दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तसेच गावातील ८०० महिलांनी दुकान बंद करण्यासाठी तक्रारीवर स्वाक्षरी केली असून गावातील महिलाशक्ती दुकान बंद करण्यासाठी पुढे सरसावली आहे. २७ मे २०२१ रोजी गायगाव सरपंच दीपमाला संजय वानखडे, उपसरपंच पंचफुला विनायक झटाले, सदस्या अरुणा गोरख खेतकर, विद्या ज्ञानेश्वर भिवटे, सत्यभामा हरिभाऊ ढोक, नजिमूनबी हबीब खान यांच्यासह ८०० महिलांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे.
दुकान बंद होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही
दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारू दुकानांविरुद्ध महिला शक्ती पूर्णपणे एकवटली असून या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करून दारूचे दुकान बंद होईपर्यंत आम्ही ग्रामपंचायत महिला पदाधिकारी स्वस्थ बसणार नाहीत.
-दीपमाला संजय वानखडे, सरपंच, गायगाव