अहो, आश्चर्यम... मूर्तिजापूरात आढळला पांढरा कावळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 05:55 PM2022-01-15T17:55:51+5:302022-01-15T17:56:19+5:30
A white crow was found in Murtijapur : मूर्तिजापूरातील मोचीपूरा भागात रोज पांढऱ्या कावळ्याचे दर्शन होत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
-संजय उमक
मूर्तिजापूर : कावळा म्हटले की, लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतो कुरुप आणि काळा कुट्ट असलेला कावळा परंतु गत एक महिन्यापासून मूर्तिजापूरातील मोचीपूरा भागात रोज पांढऱ्या कावळ्याचे दर्शन होत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गत महिनाभरापासून हा दुर्मिळ पांढरा कावळा मूर्तिजापूर येथील मोचीपुरा भागात रहिवासी असलेले दिपक देविकर हे रोज पक्षांसाठी भक्ष टाकत असल्याने यांच्या घराच्या गॅलरीत व बाजूला असलेल्या विजेच्या तारेवर रोज सकाळी हा पांढऱ्या रंगाचा कावळा येतो. रोज सकाळी या कावळ्याला पहाण्यासाठी नागरीकही गर्दी करतात. यशा पांढऱ्या रंगाच्या कावळ्याला 'ग्रेट अलबोमी क्रो' असे म्हणतात.
काळा कुरुप कावळ्याचे पितृपक्षात विशेष महत्व मानले जाते, श्राद्धा निमित्ताने कावळ्याने भोजन खावं यासाठी त्याची तासंतास वाट पाहिली जाते. परंतु काळे कावळे संस्कृतीत अशुभ मानले जात असले तरी मूर्तिजापूरात आढळून आलेला हा पांढरा कावळा कुतुहलाचा विषय ठरला आहे. तथापि कावळ्याचा रंग बदलण्यामागे विविध वैज्ञानिक कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. पांढरा कावळा देखील इतर कावळ्याप्रमाणेच आहे परंतु अनुवांशिक बदल 'ल्युसीज्म' मुळे काही कावळे पांढरे होतात.
परंतु समाजात अशीही आख्यायिका आहे की, पांढऱ्या रंगाच्या कावळ्यास अमृत शोधण्यासाठी पाठविले आणि त्याला केवळ अमृतची माहिती आणण्याचे आदेश दिले परंतु त्याने ते पिऊ नये असे देखील सांगितले. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पांढऱ्या कावळ्यांना अमृत सापडले. परंतु इतक्या कष्टानंतर त्याला अमृत पिण्याचा मोह आवरता आला नाही त्याने त्या अमृताचा आस्वाद घेतला याची माहिती संबंधित ऋषिला कळली ऋषी काळ्यावर रागावले आणि त्याने शाप देऊन त्याच्या कमंडल्याच्या काळ्या पाण्यात बुडवले, त्यानंतर कावळ्याचा रंग काळा झाला आणि तेव्हापासूनच काळ्याचा रंग काळा आहे. अशी मान्यता आहे.
--------------------
मानवाच्या कातडी मध्ये मेलॅनिन नावाचा घटक असतो त्यामुळे मानव हा सावळा व गोरा अतिशय पांढरा दिसतो मेलॅनिनच्या कमी जास्त प्रेमामुळे हा प्रकार होत असतो. त्याच बरोबर वन्य जीव पक्षी, मात्र हा प्रकार दुर्मिळच आहे. अलबिनिझम हा प्रकार कोणत्याही वन्यजिवां मध्ये असू शकतो .
- बाळ काळणे, मानद वन्यजिव रक्षकअकोला वनविभाग