आरटीओ कार्यालयात रोज २० परवान्यांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:51 PM2020-06-27T12:51:47+5:302020-06-27T12:53:11+5:30
एक नियमावली ठरविण्यात आली असून, दिवसाला २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यात येत आहे.
अकोला : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर नवीन वाहन परवाने देण्याचे कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी एक नियमावली ठरविण्यात आली असून, दिवसाला २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यात येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
राज्यात २४ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यानंतर बहुतांश शासकीय कार्यालये बंद करण्यात आली होती. त्यामुळे अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही तब्बल तीन महिने बंद होते. या कार्यालयातून या तीन महिन्यात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना ई पास देण्याचे कामकाज करण्यात आले; मात्र नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन, नवीन वाहन परवाना, वाहनाचे पासिंग यासह विविध कामे बंद करण्यात आली होती; मात्र आता टप्याटप्याने उपप्रादेशिक विभागाने या कार्यालयातील कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तसेच पासिंगसोबतच आता वाहनचालकांना परवाना देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आॅनलाइन अर्ज केल्यानंतर अपॉइनटमेंट मिळालेल्या केवळ २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. २० पेक्षा अधिक जणांना वाहन परवाना देण्यात येत नसल्याची माहिती आहे.
दलाल पुन्हा सक्रिय
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्यांची लूट करण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. दिवसाला २० च परवाने देण्यात येत असल्याने दलालांकडून पैशाची मागणीही तेवढ्याच मोठ्या रकमेची करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतरही या विभागातील दलालांनी वाहनचालकांना लुटण्याचा व्यवसाय सुरूच केल्याची माहिती एका नवीन परवाना काढण्यासाठी आलेल्या युवकाने दिली.
नवीन वाहनांच्या पासिंगसोबतच, लर्निंग लायसन्स, परमनन्ट लायसन्सचे काम आता गतीने सुरू करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज करण्यासाठी मात्र ज्यांचे काम आहे त्यांनाच कार्यालयात येण्यास परवानगी देण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केल्यानंतरच आणि आॅनलाइन अपॉइनमेंट असणाºयांनाच प्रवेश देऊन त्यांची कामे करण्यात येत आहेत.
- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.