अकोला जिल्ह्यात ५,५०० घरकुलांची कामे रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 08:59 AM2020-09-28T08:59:59+5:302020-09-28T09:00:06+5:30
६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
अकोला: रमाई आवास योजनेंतर्गत निधीअभावी जिल्ह्यात ५ हजार ५०० घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे घरकुलांच्या कामांसाठी आवश्यक असलेला ६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील लाभार्थींना मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांच्या कामांपैकी १ हजार ५०० घरकुलांची बांधकामे निधीअभावी रखडली आहेत. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील लाभार्थींना मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार घरकुलांच्या बांधकामांसाठी अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५०० घरकुलांची कामे अपूर्ण असून, चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेली ४ हजार घरकुलांची बांधकामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात अपूर्ण असलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी आणि चालू आर्थिक वर्षातील घरकुलांची नवीन कामे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यातील लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.
घरकुलांच्या कामांसाठी अशी आहे निधीची मागणी!
रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५०० घरकुलांची अपूर्ण बांधकामे पूर्ण करण्यासाठी १८ कोटी रुपये आणि चालू आर्थिक वर्षातील नवीन ४ हजार घरकुलांची बांधकामे सुरू करण्यासाठी ४८ कोटी रुपये अशी एकूण ६६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.