अमरावती विभागातील कृषी विभागाचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 10:12 AM2021-02-07T10:12:32+5:302021-02-07T10:12:41+5:30

Agriculture department कृषी विभागाचे कामकाज ८ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार असल्याने, कृषी विषयक कामांसाठी शेतकऱ्यांची हेळसांड थांबणार आहे.

The work of agriculture department in Amravati division will be resumed from Monday | अमरावती विभागातील कृषी विभागाचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत

अमरावती विभागातील कृषी विभागाचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत

googlenewsNext

अकोला : अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ विभागातील पाचही जिल्ह्यात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून पुकारलेले कामबंद आंदोलन ५ फेब्रुवारी रोजी स्थगित करण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ठप्प झालेले अमरावती विभागातील कृषी विभागाचे कामकाज सोमवार, दि. ८ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार असल्याने, कृषी विषयक कामांसाठी शेतकऱ्यांची हेळसांड थांबणार आहे.

कृषी विभागाच्या अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या दालनात सुरेश राजगुरे नामक व्यक्तीने कार्यालयातील अनुरेखक विरेंद्र भोयर यांच्याशी वाद घालून मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यात कृषी विभागातील कृषी सहायक, लिपीक, वरिष्ठ लिपीक, अनुरेखक , शिपाई व वाहनचालक इत्यादी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत कृषी विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे यासंदर्भात प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी कृषिमंत्री व राज्याचे कृषी आयुक्त यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषी आयुक्तांनी दिल्यानंतर अमरावती विभागातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दि. ५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन स्थगित केले. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ठप्प झालेले कृषी विभागाचे कामकाज सोमवार, दि. ८ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार आहे. विभागातील पाचही कृषी विभागाचे कामकाज पूर्ववत होणार असल्याने, कृषी विभागांतर्गत विविध कामांसाठी शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबणार आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन दि. ५ फेब्रुवारी रोजी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे दि. ८ फेब्रुवारीपासून कृषी विभागाचे कामाकाज पूर्ववत होणार आहे.

- शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग

Web Title: The work of agriculture department in Amravati division will be resumed from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.