अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:09+5:302021-05-20T04:19:09+5:30
२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून ...
२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून दिले. २०२० मध्ये दुसऱ्या आणखी एका कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु तेही काम बंद पडले. रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रोडवरील गिट्टी व धूळ उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थसुद्धा कमालीचे वैतागले आहेत. अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम कंत्राटदाराने २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे वर्कऑर्डरमध्येसुद्धा नमूद केले होते. परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये धूळ जात असल्याने, ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहेत. रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूम टाकत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, शेतकऱ्यांना या धुळीचा फटका बसत आहे.
खरीप हंगाम तोंडावर, शेतात कसे जावे?
खरीप हंगाम ताेंडावर आहे. या मार्गावर हजारो शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी टाकून ठेवल्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी करण्यासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
रस्त्याच्या कामात दिरंगाई
कंत्राटदाराकडून सध्या तरी रोडवर कामाची हालचाल दिसत नाही. रोडच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. निमकर्दा गावात सदर कंपनीचा ठावठिकाणा असून कंपनीमार्फत अनेक व्यावसायिकांनी मालाचा पुरवठा केला आहे. परंतु व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. वाहनांचे भाडेसुद्धा थकित असल्याची माहिती आहे. या मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही!
दोन-तीन वर्षांपासून अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम सुरू आहेत. रस्ता खोदून ठेवला. रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे. परंतु कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा जनतेच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नाही.