दिवसभर काम; रात्री विजेनंतर सिंचन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:31+5:302021-02-08T04:16:31+5:30
रवी दामोदर अकोला : यंदा बळीराजाला खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसला असून, रब्बी हंगामात पिके वाचविण्यासाठी शेतकरी दररोज ...
रवी दामोदर
अकोला : यंदा बळीराजाला खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसला असून, रब्बी हंगामात पिके वाचविण्यासाठी शेतकरी दररोज आव्हानांचा सामना करीत आहे. पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत. भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी पंपांना रात्री वीजपुरवठा केल्या जात असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबल्यानंतर, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने पीक नष्ट झाले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. कपाशीत्या पिकावर आशा होती; मात्र बोंडअळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात असतानाही पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. सद्यास्थितीत गहू, हरभरा, कांदा पिके बहरलेली आहेत. चांगले उत्पादन व्हावे, यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबत असल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत गहू कमरेेएवढा झाला आहे. तसेच शेतात मोठमोठ्या भेगा, जिकडे तिकडे अंधारच अंधार असतानाही बॅटरीच्या उजेडात शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी सकाळपासून शेतात राबूनही रात्री त्याच उमेदीने, त्याच इच्छाशक्तीने पिकाला पाणी देत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------------------------
पावला पावलावर धोका!
शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहतो. तसेच सद्यस्थितीत गहू पीक कमरेएवढे झाल्याने वन्य प्राणी दिसून येत नाहीत. पाणी शेवट्याच्या सरीतून पिकांपर्यंत पोहोचते का, याकडे लक्ष देतानाच रानडुकरांची भीती अधिक असते.
-------------------------------------------------
आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. कृषी पंपांना सातही दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा.
- शुभम दामोदर, शेतकरी, टाकळी खुरेशी, ता. बाळापूर.
------------------------------------------
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची परंपरा आहे. सध्या पिके वाढल्याने रात्रीचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने ही परंपरा मोडीत काढीत कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करावा. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊ.
- धनंजय दांदळे, उपसभापती, पं.स. बाळापूर.