दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:26 PM2019-06-21T13:26:23+5:302019-06-21T13:26:41+5:30

शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.

Work on collecting information on two hectares of farmers! | दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

googlenewsNext

अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून, सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात येत होता. दोन हेक्टर शेतजमिनीची मर्यादा शिथिल करून, योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या कृषी आयुक्तांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत शेतजमीन क्षेत्राच्या मर्यादेची कोणतीही अट नसल्याने जिल्ह्यातील दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करून, शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना गत आठवड्यात पत्राद्वारे दिले. त्यानुषंगाने जिल्ह्यात सातही तालुक्यांतील प्रत्येक गावात दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. माहिती संकलनाचे काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात शेतकरी कुटंबांची माहिती शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेले असे आहेत शेतकरी!
तालुका                शेतकरी
अकोला                ४९७९९
अकोट                  ३९२७०
बाळापूर               २३८७५
बार्शीटाकळी         २०८४५
पातूर                   १९२१७
तेल्हारा                १८३६७
मूर्तिजापूर            ३४३९८
...........................................
एकूण                  २०५७७१

दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले १.१५ लाख शेतकरी यापूर्वीच पात्र!
जिल्ह्यात एकूण ३ लाख २१ हजार ६७३ शेतकरी असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतजमीन असलेले जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकरी यापूर्वीच पात्र ठरले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या व दुसºया हप्त्याची रक्कमदेखील जमा झाली आहे.

 

Web Title: Work on collecting information on two hectares of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.