स्वॅब संकलित करताना पाॅझिटिव्ह आल्यावरही सुरू ठेवले कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:19 AM2021-03-08T04:19:06+5:302021-03-08T04:19:06+5:30
पातूर: तालुक्यातील दुर्गम भागातील २१ गावांची जबाबदारी यशस्वी पार पाडताना स्वतःच पॉझिटिव्ह आल्यानंतरही अविरत कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या आलेगाव ...
पातूर: तालुक्यातील दुर्गम भागातील २१ गावांची जबाबदारी यशस्वी पार पाडताना स्वतःच पॉझिटिव्ह आल्यानंतरही अविरत कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा निवास चव्हाण -नाईक यांचे कार्य महिला दिनानिमित्त प्रकाशझाेतात आले आहे.
पातुर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेला आलेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात या केंद्राच्या प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका डॉ. स्नेहा निवास चव्हाण -नाईक या पार पडत आहेत.
कोरोनाचा आलेगावमध्ये मे महिन्यात शिरकाव झाला. सर्वप्रथम भाजीपाला विक्रेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला. तेव्हा आलेगावात स्वॅब संकलनाची मोहीम उघडण्यात आली. रॅपिड अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून एकाचवेळी ११ जण पॉझिटिव्ह निघाले मात्र यातील काही जणांना सकृतदर्शनी लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक, कुटुंबातील व्यक्ती या सर्वांना समजावून सांगणे अतिशय जिकिरीचे आणि कठीण होते.
दरम्यान त्यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्वॅब संकलनाची मोहीम युद्धपातळीवर सुरूच ठेवली. त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान त्या स्वत: पॉझिटिव्ह आल्या तरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून विलगीकरण कक्षातून जबाबदारी पार पाडत होत्या. १५ ते २० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या कार्यरत झाल्या.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णांना सेंटरला पाठवणे अथवा बदलणारे मार्गदर्शक सूचनांनुसार होम क्वारंटाइन ठेवणे. अति जोखीम कमी जोखीम तथा बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कामगिरी पार पाडणे या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
...........................
काेराेना काळात आई,बाबांपासून दूर राहायची वेळ आली होती. एखादा दोन दिवस घरी यायला मिळाले तर घरातील सर्वांना दुरूनच बघायला लागायचे. दुर्गम भागातील आदिवासी ग्रामीण नागरिकांच्या नियमित आरोग्यासह २१ गावातील गरोदर माता, बालक यांच्यासह नियमित लसीकरणाची जबाबदारीही पार पाडली. सुरुवातीला नागरिकांमध्ये भीती होती मात्र आता चित्र बदलले आहे.
डॉ. स्नेहा निवास चव्हाण -नाईक, वैद्यकीय अधिकारी