राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करा - आयुष प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:29 AM2019-08-22T09:29:44+5:302019-08-22T09:29:50+5:30
सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सरपंच परिषदेत ते बोलत होते. सरपंच परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भंडारे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. एच.आर. मिश्रा उपस्थित होते.
सरपंचपद मोठे पद असून, या पदाच्या माध्यमातून सरपंचांना गावाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामपंचायतींचे कामकाज यासंदर्भात सविस्तर माहिती सरपंच परिषदेत देण्यात आली. जिल्हास्तरीय सरपंच परिषदेला जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी मानले.
‘सीईओं’नी सरपंचांना दिले सात संदेश!
सरपंच परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी सरपंचांना सात संदेश दिले. सरपंच हे संपूर्ण गावाचे पालक असतात. त्यामुळे त्यांनी राजधर्माचे पालन करावे, राबविण्यात येणाºया सर्व योजनांची अंमलबजावणी सरपंचांनी यशस्वीपणे केली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व अनियमितता केल्यास गावकऱ्यांपर्यंत ‘व्हॉट्सअॅप’द्वारे माहिती पोहोचते.
त्यामुळे प्रतिमा वाईट झाली तर त्याचा बोजा सात पिढीवर पडतो, जेवढे परिश्रम सरपंच पदावर निवडून येण्यासाठी केले, त्याच्या शंभर पटीने परिश्रम गावाच्या प्रगती व विकासासाठी करा, गावामध्ये जनसुविधांची कामे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्याची काळजी घेतली पाहिजे, ग्रामपंचायतला प्राप्त झालेला सर्व निधी विकास कामांवर खर्च केला पाहिजे व गावात चांगल्या वातावरणाची निर्मिती करा, असे सात संदेश ‘सीईओं’नी दिले.