दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांचे भिजत घोंगडे !
By admin | Published: January 31, 2015 12:44 AM2015-01-31T00:44:48+5:302015-01-31T00:44:48+5:30
अकोला जिल्ह्यातील केवळ ९0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त; ८ कोटींची कामे रखडली.
अकोला: दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे ८ कोटींचा निधी उपलब्ध असला, तरी या योजनेत जिल्ह्यातील तीनच पंचायत समित्यांमार्फत केवळ ९0 ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव प्राप्त झाले. उर्वरित चार पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झाले नसल्याने, जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या रखडलेल्या कामांचे घोंगडे भिजतच आहे.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २0१४-१५ या वर्षासाठी ८ कोटींचा निधी शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला. या निधीतून जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात दलित वस्ती सुधार योजनेची कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यामध्ये ३0 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातपैकी बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या तीनच पंचायत समित्यांमार्फत ९0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे प्राप्त झाले.
उर्वरित अकोला, बाश्रीटाकळी, आकोट व पातूर या चार पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आले नाहीत.
सातही पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव उपलब्ध झाले नसल्याने, कामांना मंजुरी आणि कामांसाठी ग्रामपंचायतींना निधी वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ८ कोटींचा निधी उपलब्ध असला, तरी जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांचे घोंगडे भिजतच असल्याचे चित्र आहे.