आव्हानात्मक परिस्थितीत निष्ठेने काम करा!
By admin | Published: October 12, 2015 01:53 AM2015-10-12T01:53:07+5:302015-10-12T01:53:07+5:30
प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळय़ात जिल्हाधिका-यांचे अवाहन.
अकोला: पोलिसांनी 'सदरक्षणाय व खलनिग्रहनाय' हे ब्रीदवाक्य सतत आचरणात ठेवून पोलीस खात्यातील अवघड व आव्हानात्मक परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाच्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रातातील ५८ व्या सत्रातील ५५२ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यासह व्यासपीठावर प्राचार्य विजयकांत सागर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलिसांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांचा दीक्षांत संचलन सोहळा घेण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी या प्रशिक्षणा र्थींच्या परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड कमांडर अय्याजखान पठाण व रघुनाथ होळकर यांच्या नेतृत्वात शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. यावेळी प्राचार्य विजयकांत सागर यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत २३ हजार १८३ प्रशिक्षणार्थी पोलिसांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती देऊन ५८ व्या सत्राचा निकाल ९६.७४ टक्के लागला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य विजयकांत सागर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर उज्जवला देशमुख, आयुक्त अजय लहाने यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना मार्गदर्शन केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी विनोद लिंबराज पाटोळे यांच्यासह १३ प्रशिक्षणार्थी पोलिसांना जिल्हाधिकार्यांचे हस्ते गौरविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक देवकी उइके, एस. बी. पुजारी, विधी निदेशक भुतडा, खंडारे, शैलेश तायडे व वैभव दाते यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार उप प्राचार्य डी. एस. महाजन यांनी मानले.