दिंडी मार्गाचे काम संथगतीने; मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:34+5:302021-08-13T04:23:34+5:30
पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकाेला व वाशिम या तीन जिल्ह्यांत ७०० काेटी रुपयांतून हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात ...
पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकाेला व वाशिम या तीन जिल्ह्यांत ७०० काेटी रुपयांतून हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शेगाव ते अकाेला ते वाशिम या प्रमुख दिंडी मार्गाचा समावेश आहे. काही दिवसांपासून शेगाव ते पारस ते गायगाव तसेच गाेरेगाव ते माझाेड,भरतपूर, वाडेगाव ते पातूर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यादरम्यान, रस्त्यासाठी मंजूर निधी व त्याच्या विनियाेजनात तफावत असून, रस्त्याच्या कामाची गती अतिशय संथ असल्याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेक चव्हाण यांची भेट घेऊन उपस्थित केला. रस्त्याची कामे तातडीने निकाली काढली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष निर्माण झाल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.
अधिकारी, कंत्राटदारांमध्ये समन्वयाचा अभाव
जिल्ह्यात दिंडी मार्गाचे काम हाेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांमध्ये व कंत्राटदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यातील काही कंत्राटदारांना बँकांकडून कर्ज उपलब्ध हाेत नसल्याने त्यांनी रस्त्यांची कामे बंद केली असल्याची बाब आ. देशमुख यांनी स्पष्ट केली.
कंत्राटदारांवर कारवाइची टांगती तलवार
रस्त्यांची कामे अर्धवटस्थितीत असून, पावसाळ्यात जिल्हावासीयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आ. देशमुख यांनी लावून धरली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम दिंडी मार्गावर झाला आहे. यासंदर्भात अशाेक चव्हाण यांची भेट घेतली असता, या विषयावर पुढील आठवड्यात मुंबईत बैठकीचे आयाेजन केले आहे.
- नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना