अधिवेशनाचा धसका, आरोग्य विभागात सुटीच्या दिवशीही काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 03:17 PM2020-02-21T15:17:21+5:302020-02-21T15:17:33+5:30
सुटीच्या दिवशी आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यालयातील कामकाज सुरूच ठेवले जाणार आहे.
अकोला : महाराष्ट्र विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने या दरम्यानच्या काळातील सुटीच्या दिवशी आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यालयातील कामकाज सुरूच ठेवले जाणार आहे. त्याबाबतचा आदेश आरोग्य सेवा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी दिला आहे.
विधान मंडळाचे अधिवेशन मुंबई येथे सुरू होत आहे. त्यामध्ये सर्वच विभागाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. ते प्रश्न प्राप्त करून घेणे, त्याची उत्तरे तयार करणे, ही जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. त्यामुळे ऐनवेळेपर्यंत प्राप्त प्रश्नांची उत्तरे देता यावी, यासाठी अधिवेशनापूर्वीच्या सुटीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य सेवा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी घेतला. त्या निर्णयानुसारचा आदेश सर्वच स्तरावरील आरोग्य विभागाच्या कार्यालयांना सोमवारीच देण्यात आला. त्यामध्ये १९ व २२ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्याचे म्हटले आहे. त्या दिवशी अधिवेशनातील प्रश्नोत्तरांसह इतर अती महत्त्वाची कामे केली जातील. या सुटीच्या दिवशी आरोग्य सेवा संचालक मुंबई, पुणे, सर्व कार्यक्रम प्रमुख, सर्व परिमंडळ आरोग्य उपसंचालक कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय या कार्यालयातील कामकाज सुरू ठेवले जाईल. सोबतच इतरही विभागांच्या कार्यालयातील कामकाजही सुरू राहणार आहे.