मजुरांच्या हाताला मिळेना काम!

By admin | Published: April 6, 2016 01:48 AM2016-04-06T01:48:29+5:302016-04-06T01:48:29+5:30

अकोला जिल्ह्यात रोहयो कामांवर केवळ ३२५७ मजूर.

Work at the hands of laborers! | मजुरांच्या हाताला मिळेना काम!

मजुरांच्या हाताला मिळेना काम!

Next

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प असल्याने, मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात गावागावांतील मजुरांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. एकीकडे मजुरांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवर केवळ ३ हजार २५७ मजूर असल्याची स्थिती आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ जाहीर झाला; मात्र दुष्काळग्रस्त गावांना द्यावयाच्या सवलती आणि शेतकर्‍यांना मदत अद्यापही शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू भागात कोणतीही पिके नाहीत तसेच पाणीटंचाईच्या परिस्थितीत बागायती क्षेत्रातही पिकांची स्थिती चांगली नाही. त्यानुषंगाने जिल्हाभरात शेतीची कामे ठप्प असल्याने, शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.
काम नसल्याने मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हाताला काम मिळविण्यासाठी गावागावांतील मजुरांकडून कामाचा शोध घेतला जात आहे तसेच मिळेल ते काम करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही मजूर कुटुंबातील तरुणांना कामासाठी शहरात जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे मजुरांच्या हाताला काम मिळनासे झाले आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व विविध यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांमध्ये सध्या ४३८ कामे सुरू असून, रोहयोच्या या कामांवर सरासरी ३ हजार २५७ मजूर काम करीत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील इतर मजुरांना मात्र कामासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Work at the hands of laborers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.