शेतकऱ्यांनी बंद पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:44 PM2018-04-17T18:44:14+5:302018-04-17T18:44:14+5:30
नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले.
नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळीच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पस्थळी शुकशुकाट होता.
नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पासाठी २०११ ते २०१३ या कालावधीत संपादित जमिनीला दोन लाख रुपये एवढाच अल्पदराने मोबदला मिळाला. या प्रकल्पबाधित कास्तकारांना २०१७-२०१८ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे वाढीव ८ ते १० लाख रुपये मोबदला द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या लेखी प्रस्तावामुळे ३ एप्रिल रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित केले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय पूर्ण न झाल्यामुळे अखेर नया अंदुरा प्रकल्पच्या ठिकाणी जाऊन १७ एप्रिल रोजी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाचे काम बंद पाडून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले.
नया अंदुरा प्रकल्पात कारंजा रम., अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खु. या गावांतील २२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत असताना अल्पदराने जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही, असा संतप्त सवालही कास्तकारांनी उपस्थित केला आहे. जमिनीचा वाढीव भाव मिळावा, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरी, पेन्शन योजना किंवा एकरकमी १० लाख रुपये द्यावे, बाळापूरचे उपविभागीय अधिकाºयांनी १.५ चा गुणांक लावून खरेदी केलेल्या त्या नवीन शासन परिपत्रकाप्रमाणे २ चा गुणांक लावून खरेदी कराव्यात, आधी पुनर्वसन मगच धरण, याप्रमाणे प्रकल्पबाधित घरांचे तत्काळ पुनर्वसन करून नवीन घरे बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे; मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणाचे ‘काम बंद’ आंदोलन व उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)