कामाला लागा, अन्यथा खैर नाही!
By admin | Published: October 13, 2014 12:53 AM2014-10-13T00:53:01+5:302014-10-13T00:53:21+5:30
बुलडाणा येथील जाहीर सभेत मुकुल वासनिक यांचा इशारा.
बुलडाणा : ज्यांची काँग्रेसवर निष्ठा नव्हती, ते पक्ष सोडून गेलेत. जे प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत, ते प्राणपणाला लावून पक्षाचे काम करताहेत. अजूनही वेळ गेली नाही. काँग्रेसचे सर्व नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे, येणार्या काळात जो काँग्रेससोबत राहणार नाही, तो माझ्यासोबत राहणार नाही आणि भविष्यात त्याला काँग्रेसमध्ये कुठेही थारा मिळणार नाही, अशा सज्जड दम काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांनी रविवारी जाहीर सभेत दिला. बुलडाणा येथील सहकार विद्यामंदिराच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेच्या व्यासपिठावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री नमोनारायण मीना, लालचंद्र कटारीया, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे आणि पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील लोकांनी मला खूप काही दिले. काँग्रेसची विचारधारा येथील मातीत रूजली आहे. पक्षासाठी येथील सामान्य कार्यकर्ता जिवाचे रान करतो; पण एकीकडे फुले, शाहु आंबेडकारांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे भाजप, शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाच्या लोकांना निवडून द्यायचे, हे आता खपवून घेतल्या जाणार नाही. ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, अशा शब्दात वासनिक यांनी स्वपक्षातीलच नेते, कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.