रस्त्याचे काम वेग घेईना, खड्डय़ांचा त्रास संपेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:20 AM2017-11-21T01:20:12+5:302017-11-21T01:25:05+5:30
इन्कमटॅक्स चौकातील बॉटल नेकमुळे ५00 मीटर अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाला विलंब झाल्याची सबब पुढे केली जात असली तरी त्यासमोरील गोरक्षण ते तुकाराम चौक रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडेल असल्याने नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस भर पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकपर्यंत तयार केल्या जाणार्या सिमेंट रस्त्याच्या कामाची मोठय़ा धडाक्यात सुरुवात केली. इन्कमटॅक्स चौकातील बॉटल नेकमुळे ५00 मीटर अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाला विलंब झाल्याची सबब पुढे केली जात असली तरी त्यासमोरील गोरक्षण ते तुकाराम चौक रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडेल असल्याने नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस भर पडत आहे. कंत्राटदाराच्या धिम्या गतीवर संबंधित विभागाने चुप्पी साधणे पसंत केले असून, नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकपर्यंतच्या २ हजार ६३१ मीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली होती. नागरिकांना होणारा त्रास व या मार्गावरील वर्दळ ध्यानात घेता आ. गोवर्धन शर्मा यांनी सिमेंट रस्त्यासाठी १३ कोटींची तरतूद केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण रस्ता दुरुस्तीची एक निविदा न काढता टप्प्याटप्प्यात निविदा प्रक्रिया राबवली.
नेहरू पार्क चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. महावितरण कार्यालय ते इन्कमटॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअर पर्यंतच्या मार्गावर बॉटल नेक निर्माण होणार असल्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले होते.
यादरम्यान, लक्ष्मी हार्डवेअर ते गोरक्षणलगतच्या स्टेट बँकेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर तेथून पुढे सहकार नगर व त्यापुढील रस्त्याच्या कामाला सुरुवात करणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदाराने हात आखडता घेतल्याचे दिसत आहे. गोरक्षणपासून पुढे रस्त्यावरील खड्डय़ातून प्रवास करणे नागरिकांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे.
निधी उपलब्ध असतानाही केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे.
अकोलेकरांनो जरा सांभाळून!
नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालयापर्यंत तयार झालेला सिमेंट रस्ता एकसमान नसल्यामुळे त्यावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास होत आहे. सिमेंट रस्त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केल्यानंतरही कंत्राटदार रस्त्याची गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवण्यात कमी पडले आहेत. त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अकोलेकरांनो जरा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
रस्त्याचा कालावधी निश्चित नाही
रस्त्याच्या कामासाठी निविदेत ठरावीक कालावधी नमूद केला जातो. त्या कालावधीनुसार कंत्राटदाराला काम करावे लागते. या नियमांना गोरक्षण रोड अपवाद ठरतो. गोरक्षण ते सहकार नगर व त्यासमोरील रस्ता तयार करण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात ‘पीडब्ल्यूडी’चे वरिष्ठ अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. त्यामुळे संत तुकाराम चौकापर्यंतचा रस्ता कधी तयार होईल, याची तूर्तास काहीही श्वाश्वती नसल्याची परिस्थिती आहे.
शुभमंगल कार्यालय ते सहकार नगर रस्त्यावर काही ठिकाणी नाल्या, पाइप लाइनसह विद्युत वाहिनीची कामे निकाली काढण्यात आली. त्यामुळे विलंब झाला. उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल.
-मिथिलेश चौहान, कार्यकारी अभियंता, ‘पीडब्ल्यूडी’
-