बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:18+5:302021-05-21T04:20:18+5:30
बोरगाव मंजू येथील नागरिकांनी वारंवार संबंधितांना लेखी निवेदन देऊन बोरगाव मंजू येथील नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम त्वरित ...
बोरगाव मंजू येथील नागरिकांनी वारंवार संबंधितांना लेखी निवेदन देऊन बोरगाव मंजू येथील नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम त्वरित सुरु करावे. यासाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु संबंधितांनी अद्यापही निर्णय न घेतल्याने बोरगाव मंजू येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान हे मंजुरात ग्रामिण रुग्णालयाचे काम रखडल्याने या आधी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही.
तांत्रिक कारणांमुळे रूग्णालयाचे काम रखडले
२०१५ साली ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम मंजूर झाले होते. दरम्यान तांत्रिक कारणामुळे गत सहा वर्षांपासून रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे मुख्य बाजारपेठ असून, गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे. यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केली. याची दखल घेत, शासनाने ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते.
ग्रामपंचायतने दिली जागा
ग्रामपंचायतीने जागासुद्धा उपलब्ध करून दिली. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती करिता जागा अपुरी पडत असल्याचे तांत्रिक कारण समोर करीत, इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी १६ सप्टेंबर २०१५ रोजी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला जुनी इमारत पाडण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पत्र दिले होते. बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाज पत्रक व आराखडा तयार केला होता. मंजुर झालेले ग्रामिण रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लसीकरण मोहिमेचा बोजवारा
येथील ग्रामीण रुग्णालयात गत काही दिवसांपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत कमी लस उपलब्ध होत आहेत. तसेच गत काही दिवसांपासून लस येथील रुग्णालयात उपलब्ध नसल्याने नागरिक लसीपासून वंचित आहेत.