गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:37 PM2018-11-12T12:37:39+5:302018-11-12T12:37:48+5:30
महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अकोला : मोठा गाजावाजा करीत भाजपाने नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. सद्यस्थितीत महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. महापालिकेचे उदासीन धोरण व सत्ताधारी भाजपाच्या मतांच्या राजकारणामुळे गोरक्षण रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याची एक बाजू अर्धवट सोडली आहे. रस्त्याचे अर्धवट बांधकाम करून कंत्राटदाराने हात वर केले आहेत. महापारेषण कार्यालय ते छत्रपती चौकापर्यंत रस्त्यालगतच्या इमारतींचा काही भाग हटविण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून, विद्युत पोलचे शिफ्टिंग रखडले आहे. इन्कम टॅक्स चौकात दोन्ही बाजूंच्या इमारतींचा काही भाग हटविताना प्रशासनाने धडक कारवाई केली होती. आता मात्र ही कारवाई थंड बस्त्यात सापडल्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम रेंगाळल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने व विद्युत विभागाने धडक कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे प्रशासनावर नेमक्या कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोल शिफ्टिंग नाहीच!
आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अर्धवट रस्ता तयार केला आहे. शिवाय, त्या ठिकाणी विद्युत पोलचा अडथळा कायम आहे. यासंदर्भात महापौर जितेंद्र वाघ यांनी मनपाचे विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना पोल शिफ्टिंग करण्याचे निर्देश दिले होते. मागील महिनाभरापासून अद्यापही रस्त्याच्या मधातील विद्युत खांब कायम आहेत, हे विशेष.