पारस औष्णिक विद्युत केंद्रात विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 07:05 PM2019-10-29T19:05:57+5:302019-10-29T19:06:03+5:30
राजू जतीन मंडल (३४) असे मृतक कामगाराचे नाव असून, तो गुवाहाटीचा रहिवासी आहे.
पारस (अकोला) : येथील औष्णिक वीज केंद्रातील संरक्षक भिंतीवर काम करीत असताना विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. राजू जतीन मंडल (३४) असे मृतक कामगाराचे नाव असून, तो गुवाहाटीचा रहिवासी आहे.
औष्णिक वीज केंद्राच्या संरक्षण भिंतीवर मल इजि. कन्स्ट्रक्टर कंपनीचे काम सुरू आहे. या भिंतीवर व्ही अँगल लावण्याचे काम करीत असताना वर असलेल्या ११ केव्ही लाइनचा स्पर्श झालेल्या राजू मंडल हा खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मारला. घटनेची माहिती मिळताच त्याला वीज केंद्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्याला सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनास्थळावर बाळापूर पोलिसांनी भेट दिली. तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्य अभियंता औष्णिक वीज केंद्र पारस यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे फॅक्टरी इन्स्पेक्टर अकोला, मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांनीही भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)