World Environment Day : अकोलेकरांचा श्वास कोंडतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:06 PM2019-06-05T15:06:08+5:302019-06-05T15:06:44+5:30
एकीकडे वाढत्या तापमानाची समस्या असतानाच धूळ व ध्वनी प्रदुषणही वाढतेच आहे. त्यामुळे अकोलेकरांचा श्वास कोंडत असल्याचे चित्र आहे.
अकोला : अकोला शहराचे वाढते तापमान हे जगप्रसिद्ध ठरत आहे. या उन्हाळ््यात लागोपाठ दोन वेळा अकोल्याच्या तापमानाने जगात उच्चांक गाठला. एकीकडे वाढत्या तापमानाची समस्या असतानाच धूळ व ध्वनी प्रदुषणही वाढतेच आहे. त्यामुळे अकोलेकरांचा श्वास कोंडत असल्याचे चित्र आहे.
अकोल्याचे तापमान १०० वर्षापर्यंत तपासले असता ४७.८ अंश सेल्सिअस दिसत नाही. तथापि, यावर्षी हे कमाल तापमान एप्रिल व मे महिन्यात वाढले. ग्लोबल वॉर्मिंग तर आहेच; पण या मागची येथील कारणे तपासली तर मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड हे कारण पुढे येते.
गावातील, रस्त्याच्या कडेची, शेताच्या बांधावरील वृक्ष गायब झाली आहेत. दुसरे म्हणजे वेगाने होणारे शहरांचे सिमेंटीकरण, मोटारीची वाढलेली संख्या त्यातून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन, घरातील, वाहनातील वातानुकूलित यंत्र, रेफ्रीजेटर आदी तापमान वाढीला कारणीभूत ठरत आहे. या सर्वांचा परिणाम पावसावर झाल्याने आणखी मोठा धोका आपण तयार केला आहे. राज्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. तथापि, वृक्ष नंतर जातात कोठे, याचा शोध कागदावरच असतो. दरम्यान, विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याने तसे नियोजन करू न पुढच्या ५० वर्षांची गरज बघून रस्ते व इतर विकास कामे गरजेचे आहे.
झाडे किती लावली?
- अकोला महापालिकेला गेल्यावर्षी १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी महापालिकेने ग्रीन झोनमध्ये ११ हजार ४७६ झाडे लावली.
- ३३ कोटी वृक्ष लागवड या महत्वाकांक्षी योजनेत गेल्यावर्षी जिल्ह्याने उद्दीष्टपूर्ती केल्याचे जिल्हा प्रशासनाचा अहवाल स्पष्ट करते.
- ‘अमृत योजने’अंतर्गत महापालिकेच्या क्षेत्रात १३ ग्रीन झोन कार्यांन्वित असून, त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ’
- यावर्षी महापालिकेला २0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आजपर्यंत १३ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.
प्रशासन काय उपाय करतेय?
३३ कोटी वृक्ष लागवड शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यावर्षी येत्या जुलैमध्ये वृक्ष लागवड करावयाची आहे. वृक्ष अंतर्गत अकोला जिल्ह्याला ६२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कन्या बाल समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबात कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांना वृक्ष लागवडीसाठी १० वृक्ष मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शहरी स्तरावर नगरपालिकेने यादी तयार करून सामाजिक वनीकरण विभागाला देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
कॉर्बन उत्सर्जन, ग्रीन हाऊसेस, वाहनांचा वाढलेला वापर, शहर, रस्त्याचे सिमेंटीकरण, पर्यावरणला घातक ठरत आहेत. अकोलासारख्या जिल्ह्यात वृक्ष संपदेचा ºहास तापमानात भर घालत आहे.
- डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
फळे, औषधी गुणधर्मयुक्त झाडे गावांमध्ये लावली तर त्यांचे संवर्धन करण्यात नागरिकांना जास्त स्वारस्य असते. त्यामुळे अशा झाडांचेच गावांमध्ये रोपण करावे, जेणेकरून ती वाचण्याची शक्यता अधिक राहील. झाडांसोबत भावनिक संबंध जोपासल्या गेले, तर ती झाडे जगण्याची शक्यता अधिक असते.
- ए. एस. नाथन,
संस्थापक, भारत वृक्ष क्रांती