World Heart Day : हृदयातील अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 11:59 AM2021-09-29T11:59:08+5:302021-09-29T11:59:22+5:30
World Heart Day : हृदयातील या अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा, असा सल्ला जागतिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
- प्रवीण खेते
अकोला : कोरोनाच्या भीतीने अनेकांचे नातेसंबंध दुरावले. दीड वर्षापासून अनेकांचा इतरांशी संपर्क तुटला. त्यामुळे एकाकी पडलेल्या अनेकांना विविध आजारांसोबतच हृदयविकाराच्या समस्याही उद्भवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा व्यक्तींना हृदयविकारापासून सावरण्यासाठी पुन्हा त्याच नात्यांची गरज असून, हृदयातील या अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा, असा सल्ला जागतिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
कुटुंबातील एका सदस्याला कोरोना झाला, इतरांचा त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे नातेसंबंधही दुरावले. शिवाय, वयोवृद्धांसह दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनाच्या या काळात स्वत:ला इतरांपासून दूर ठेवल्यानेही त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. या परिस्थितीमुळे एकाकी पडलेल्या अनेकांना हृदयविकारासह विविध आजारांना सामोरे जावे लागले. अशा व्यक्तींना गरज आहे, ती आपलेपणाची. त्यामुळे काेरोनाच्या काळात दुरावलेली ही नाती पुन्हा जोडण्याची गरज आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कोणाला प्रत्यक्षात भेटणे शक्य नसले, तरी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते शक्य आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त जागतिक आरोग्य संस्थेतर्फे ‘यूज हार्ट टू कनेक्ट हार्ट’ हा विषय निवडला आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणाही यासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करत आहे.
ही काळजी घ्या
प्रत्येकाने संतुलित आहार घेण्याची गरज आहे.
तूप, तेल, मैदा, बेसन, साखर आणि मीठ या पदार्थांचे जास्त सेवन हे आजाराला निमंत्रण देणारे आहे.
त्यामुळे हे पदार्थ आहारात मर्यादित घ्या.
चालाल तर वाचाल
कोविडच्या काळात बैठे कामांमुळे अनेकांना स्थूलपणाला सामोरे जावे लागत आहे.
त्याचा विपरीत परिणाम हृदयावर देखील होत आहे.
यापासून बचावासाठी नियमित व्यायाम करण्याची गरज आहे.
व्यायामासोबतच रोज चालणेही तेवढेच आवश्यक आहे.
आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांनाच हृदय विकाराला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांनाही हा त्रास होत आहे. कोराेनाच्या काळात त्यात आणखी भर पडली आहे. कोरोनाकाळात अनेकांचा इतरांसाेबतचा संपर्क तुटल्याने ते एकाकी पडले आहेत. त्यामुळे आजार देखील वाढू लागले आहेत. हृदयातील हे अंतर कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेऊन दुरावलेल्या व्यक्तींना पुन्हा जवळ आणणे शक्य आहे. त्यामुळेच यंदाच्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने ‘यूज हार्ट टू कनेक्ट हार्ट’ हा विषय निवडला आहे.
- डॉ. श्रेय अग्रवाल, फिजिशियन, अकोला