World No Tobaco Day : तंबाखू दरवर्षी घेतो १० लाखांवर जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:31 AM2020-05-31T10:31:56+5:302020-05-31T10:35:54+5:30
देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशात कोरडी पाने, सिगारेट, बिडी, चिलम, गुटखा आदी अशा विविध रूपात तंबाखू सेवन केले जाते. देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो. दर ५ व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे. अशी माहिती लोकसेवा संघाचे अध्यक्ष डॉ. योगेय साहू यांनी दिली.
तंबाखू सेवनामुळे अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. यामध्ये अधरोस्कोलोरोसिस, हार्ट अटॅक, पेरिफेरल वॅस्कुलर डिसिज, ब्रेन स्ट्रोक, अॅम्पायसिमा लंग, कॅन्सर, फिटल डॅमेज, लॉरेंजियल कॅन्सर, डेंटल प्रॉब्लेम, ल्युकोप्लाकिया, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, ओरल कॅन्सर तसेच प्रती दिवशी २० सिगारेट ओढणारा व्यक्ती आपले आयुष्य १० वर्षांनी कमी करून घेतो. गुटखा खाणाऱ्या व्यक्तीमध्ये वारंवार तोंड येणे, तोंडात लाल व पांढरे चट्टे दिसणे, जेवण करताना तिखट लागणे, तोंड कमी उघडणे, तोंडातील एखादी जखम एक महिन्यापेक्षा जास्त न बसणे, तोंडात एखादी अनावश्यक गाठ आढळणे, जिभेला असणारी एखादी गाठ होणे, आवाजात झालेला बदल, लाळग्रंथीच्या जागेवर सूज येणे आदी लक्षणे हळूहळू दिसून येतात, असेही त्यांचे म्हणने आहे.
तंबाखूतील विषारी द्रव व त्याचे शरीरावर होणारे परिणाम
निकोटिन : कॅन्सर, रक्तचाप,
कार्बन मोनोक्साईड : हृदयरोग, अंधत्व, दमा.
मार्श गॅस : शक्तिहीनता, नपुंसकता
अमोनिया : मंद पाचनशक्ती, पित्ताशय, विकृती
कोलोडॉन : स्नायूमध्ये विकृती, डोके दुखणे
पापरीडीन: अजीर्ण, डोळ्यांची जळजळ
कार्बालिक अॅसिड : अनिद्रा, विस्मरण
परफेरॉल: अशक्तपणा
अँजेलिन सायनोझोन: रक्तविकार
फॉस्फोरल प्रोटिक अॅसिड : उदासीनता, टीबी
योग करा
योग करून आपल्या मनाचा कठोर निश्चय करा व संकल्प शक्ती वाढवून या नशेचा परित्याग करा. उपचार म्हणून शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी करता येते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होतो; पण वेळेवर उपचार केल्यास बरा होऊ शकतो.
तंबाखूपासून दूर राहावे
‘तंबाखूमुक्त भारत’ ही संकल्पना डॉ. साहू तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्राच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून राबवित असून, भारतातील हे पहिले केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू दिनानिमित्त तंबाखू त्यागाचा संकल्प करावा, असे आवाहन करत तरुणांनी तंबाखूपासून दूर राहावे.