जागतिक परिचारिका दिवस : रुग्णसेवेतच जगण्याचा खरा आनंद - कांचन आठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:38 PM2019-05-12T13:38:18+5:302019-05-12T13:38:39+5:30
११ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
अकोला : आम्हीही माणसेच... पण, घर संसार आणि विविध समस्यांना सामोरे जाऊन रुग्णसेवा करावी लागते. रोजची दगदग अन् कामाचा अतिभाग यातच रुग्णांच्या नातेवाइकांचा रोष नेहमीच परिचारिकांवर असतो; मात्र यापलीकडे स्वत:चे दु:ख विसरून रुग्णांवर मायेची फुंकर घालत त्यांची अहोरात्र सेवा करण्यातच जीवन जगण्याचा खरा आनंद आहे, असे अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांनी म्हटले. १२ मे हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शनिवार, ११ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा परिचारिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केल्यानंतर परिचारिका रुग्णांजवळ जास्त काळ असते. त्यांच्या नातेवाइकांपेक्षा जास्त वेळ. त्यामुळे रुग्ण व परिचारिकांमध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. त्यात रुग्ण बालक किंवा अनोळखी असल्यास त्यांची सेवा जास्त करावी लागत असल्याने ते कुटुंबातील एका सदस्यांप्रमाणेच असतात; पण कधीकधी नातेवाइकांचा धीर सुटतो अन् त्यांचा रोष परिचारिकांवरच ओढवतो; मात्र कुटुंबातील एक सदस्य म्हणून हा रोष पचवत परिचारिका रुग्णसेवेला प्राधान्य देतात.
परिचारिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?
वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या खूप कमी आहे. नियमानुसार चार ते पाच रुग्णांमागे एक परिचारिका असणे आवश्यक आहे; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ २७५ परिचारिका कार्यरत आहेत. त्यामुळे एक परिचारीका ८० ते ९० रुग्णांचा सांभाळ करते. अशा परिस्थितीत रुग्णसेवा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा अतिभार झाल्याने स्वत:कडे तर दुर्लक्ष होतेच, शिवाय कुटुंबालाही वेळ देता येत नाही.
संसार आणि रुग्णसेवेचा समतोल कसा साधता?
रुग्णसेवा हे परिचारिकेसाठी व्रत आहे; पण त्याचसोबत परिचारिकांना त्यांचा संसारही आहे. गुण्यागोविंदाचा संसार करीत असताना रुग्णसेवेचे व्रत पूर्ण होऊ शकते, त्याला कारण म्हणजे परिचारिकेचे कुटुंब. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आमच्या समस्या आणि वेदना समजून घेत असल्यानेच दोन्हीमधला समतोल साधणे सहज शक्य आहे.