World Population Day : लॉकडाऊनमध्ये घसरला अकोला जिल्ह्यातील जन्मदर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:29 AM2020-07-11T10:29:26+5:302020-07-11T10:33:18+5:30
जानेवारी २०२० च्या तुलनेत हा आकडा जवळपास ३६ ने कमी आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात दररोज साधारणत: ८० शिशूंच्या जन्माची नोंद केली जाते; परंतु लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील जन्माचा दर घसरल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून निदर्शनास आले आहे. जून महिन्यात दिवसाला सरासरी ५४ नवजात शिशूंच्या जन्माची नोंद झाली असून, जानेवारी २०२० च्या तुलनेत हा आकडा जवळपास ३६ ने कमी आहे.
लोकसंख्या वाढ ही जागतिक समस्या असून, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे जगासमोर मोठे आव्हान आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये ही गंभीर समस्या असून, त्यावर नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम आहे; परंतु यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा यावर विशेष परिणाम झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात दररोज साधारणत: ८० शिशूंच्या जन्माची नोंद होते. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या शिशूंचा समावेश आहे; परंतु लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात जन्मदर घसरल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्याबाहेरून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाणही घटले
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा चांगली असल्याने शेजारील जिल्ह्यातील गर्भवती मोठ्या संख्येने अकोल्यात दाखल होतात; परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात प्रवेश शक्य नसल्याने बाहेरील जिल्ह्यातून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील जन्मदर घटला आहे.
लोकसंख्या वाढ ही मोठी समस्या असून, त्यावर नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काम सुरू आहे. शिवाय, स्त्री भ्रूणहत्येवर नियंत्रण आणून लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठीही जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबविले जातात. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याच्या बाहेरून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाण घटल्याने ही तफावत दिसून येत आहे.
- डॉ. फारूख शेख, आरोग्य अधिकारी, मनपा, आरोग्य विभाग, अकोला