‘कोरोना’च्या संकटातून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:42 PM2020-04-08T17:42:39+5:302020-04-08T17:42:45+5:30
कोरोनाच्या संकटातून देशवासीयांना वाचवावे, अशी प्रार्थना भाविकांनी केली.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: चैत्र शुद्ध पौर्णिमेस बुधवारी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव शहरात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट अधिकच गडद झाल्याने देवळात व कुस्ती आखाड्यात यंदा केवळ धार्मिक विधीनुसार पूजा करून जन्मोत्सव झाला. तेज, बल, बुद्धिमत्ता व वायुवेग हनुमानाकडे होता. त्यामुळे तो मनाच्या गतीने विहार करू शकतो. संकटमोचन हनुमान चिरंजीव आहे, असे पुरानात सांगितले आहे. म्हणूनच कोरोनाच्या संकटातून देशवासीयांना वाचवावे, अशी प्रार्थना भाविकांनी केली.
मारुती पूजन, पाळणा, आरती, चंदन, केसर, लाल वस्त्र, रुईच्या पाना-फुलांचा हार चढवून उपस्थितांना बुंदीचे लाडू व सुंठवडा प्रसाद देण्यात आला. प्राचीन मातृभक्त श्री तपे हनुमान मंदिर, काळा मारुती मंदिर, सालासार बालाजी मंदिर, अनोखा हनुमान मंदिर, कर्ता हनुमान, पंचमुखी मारुती मंदिर, मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिर आदी मंदिरात जन्मोत्सव झाला. केवळ पूजेपुरते मंदिराचे द्वार उघडे होते. भक्तांना यावेळी मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. फक्त पुजारी मंडळी यावेळी उपस्थित होती.