श्रमदान करून वडिलांना वाहिली आदरांजली
By admin | Published: April 22, 2017 01:13 AM2017-04-22T01:13:11+5:302017-04-22T01:13:11+5:30
बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिदिनाला श्रमदानात परावर्तित केले.
अकोला : बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिदिनाला श्रमदानात परावर्तित केले. शिर्ला गावासाठी तीन लाख लीटर पाणीसाठा निर्माण करीत समाजापुढे नवा आदर्श उभा केला.
एसडीओ खडसे यांचे वडील महादेव खडसे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांचा आज पहिला स्मृतिदिन शिर्ला येथे त्यांच्या परिवारातील ४९ सदस्यांनी तब्बल दोन तास श्रमदान केले.
श्रमदानातून ३0 समतल चर खोदले. त्यातून तीन लाख लीटर वाहून जाणारे पाणी थांबण्याची क्षमता या क्षेत्रात निर्माण झाली. एरव्ही आपण स्मृतिदिन समाजात शेकडो रुपये खचरून करतो; मात्र एसडीओ खडसे यांनी परंपरेला फाटा दिला. शिर्ला गावाच्या दुष्काळमुक्तीसाठी योगदान देत नवा आदर्श निर्माण केला. त्यांनी श्रमदानासोबतच दहा तास जलसंधारणासाठी जेसीबी यंत्र स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. यावेळी सुमित्राबाई अंधारे महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी ३१ हजार रुपयांची नगदी, तर विजय कोकाटे यांनी २१ हजारांची देणगी सरपंच रिना शिरसाट, सचिन कोकाटे यांना सुपूर्द केली.
श्रमदान केल्यानंतर कालकथित महादेवराव खडसे यांना माळरानावरच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कमलाबाई महादेवराव खडसे, प्रा. संजय खडसे, नीता संजय खडसे, डॉ. सतीश खडसे, डॉ. सुनीता खडसे, गौतम खडसे, सुदाम मनवर, लता मनवर, बेबी मनवर, काशीराम निमकंडे आदी उपस्थित होते. संचालन संतोषकुमार गवई यांनी, तर आभार सचिन कोकाटे यांनी मानले. श्रमदान मोहिमेत जलसैनिक तथा शिर्ला गावकरी सहभागी झाले होते.