कुस्तीगीर प्रेरणा व वैष्णवीने जिंकला परीक्षेचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:55 PM2019-05-29T13:55:12+5:302019-05-29T13:55:34+5:30

प्रेरणा व वैष्णवी या महिला मल्लांनी परिस्थितीशी दोन हात करीत उत्तम गुण मिळवित परीक्षेचा आखाडादेखील जिंकला.

Wrestling champ prerna and Vaishnavi passed HSC exam | कुस्तीगीर प्रेरणा व वैष्णवीने जिंकला परीक्षेचा आखाडा

कुस्तीगीर प्रेरणा व वैष्णवीने जिंकला परीक्षेचा आखाडा

googlenewsNext


- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: लाल मातीमधील खेळ हा पोरींचा खेळ नाही. पोरींनी फक्त नृत्य-गायन, वीणकाम-भरतकाम किंवा लगोरी-लपंडाव खेळावे, फारच झाले तर खो-खो किंवा कबड्डी खेळावे; परंतु पहिलवानकी पोरींनी करू नये, असे आजही ग्रामीणच काय शहरी भागातही म्हटले जाते. फोगट भगिनींनी तमाम भारतीयांना दाखवून दिले आहे, की मुलीदेखील उत्तम कुस्तीगीर असतात; मात्र आजही कुस्तीच्या आखाड्यात मुलींना पालक पाठवित नाहीत; परंतु अकोल्यातील महिला मल्ल हा समज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये प्रेरणा व वैष्णवी या महिला मल्लांनी परिस्थितीशी दोन हात करीत उत्तम गुण मिळवित परीक्षेचा आखाडादेखील जिंकला.
प्रेरणा विष्णू अरू ळकार हिचे वडील भाजीपाला विकतात. आई आशा या गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थितीत बेताचीच. परिस्थितीशी झगडा करीत प्रेरणा आपल्यासारख्या अनेक नवतरुणींचीच प्रेरणा बनली आहे. प्रेरणाने बारावीच्या अभ्यासासोबतच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सी.एम. चषक कुस्ती स्पर्धेत अकोल्याचे प्रतिनिधित्व करीत सर्वोत्तम खेळ प्रदर्शन केले. तसेच आमदंगलीदेखील गाजविल्या. खेळ आणि अभ्यास याचा सुवर्णमध्य साधत प्रेरणाने ८०.७६ टक्के गुण मिळविले. त्यातही अर्थशास्त्र आणि संस्कृत या दोन्ही विषयात ८९ गुण मिळविले. प्रेरणाला भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
दुसरी मल्ल वैष्णवी रवींद्र कोटरवार हिने कला शाखेत ७२ टक्के गुण मिळविले आहेत. वैष्णवीने इयत्ता दहावीतदेखील कोणताही शिकवणी वर्ग न लावता ९० टक्के गुण मिळविले होते. वैष्णवीची आर्थिक परिस्थिती जेमतेम. वैष्णवीचे वडील रिक्षा चालवितात. कधी रंगकाम करतात तर आई पापड लाटून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावते. वैष्णवी बारावीच्या अभ्यासासोबतच आईला पापड लाटण्यात मदत करीत होती. नियमित कुस्तीचा सराव करीत होती. विभागीय सी.एम. चषक कुस्ती स्पर्धेत वैष्णवीने अकोल्याला रौप्यपदक मिळवून दिले होते. शालेय कुस्ती स्पर्धेतही वैष्णवीने बाजी मारली. वैष्णवीला भविष्यात पत्रकारिता करायची आहे.
प्रेरणा व वैष्णवी या दोघीही मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. जुने शहरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या मल्ल आहेत. वस्ताद राजेंद्र गोतमारे यांच्या मार्गदर्शनात दोघींचाही उज्ज्वल भविष्याचा आलेख उंचावत आहे. पालक आणि शिक्षक यांचे सातत्याने प्रोत्साहन दोघींना लाभत असते. मुख्याध्यापिका रसिका वाजगे यांनी दोघींचेही कौतुक केले.
 

 

Web Title: Wrestling champ prerna and Vaishnavi passed HSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.