‘रेमडेसिविर’च्या बाटलीवर लिहा रुग्णाचे नाव व बिल क्रमांक;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:16+5:302021-04-27T04:19:16+5:30
अकोला : कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व ...
अकोला : कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक नमूद करावा, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी केले आहे.
कोरोना उपचारासाठी वापरात येणारे औषध इंजेक्शन रेमडेसिविर हे काही समाजकंटकांकडून जादा किमतीत विक्री करण्याचे प्रकरण पोलिस यंत्रणा व अन्न व औषध प्रशासनाव्दारे उघडकीस आणले असून या प्रकरणी सिव्हील लाईन पोलिस स्टेशन अकोला येथे औषध निरीक्षक संजय राठोड यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
तथापि, इंजेक्शन रेमडेसिविरचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक किरकोळ विक्रेत्याने इंजेक्शन बाटलीवर रुग्णाचे नाव, बिल क्रमांक नमूद करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही रुग्णास इंजेक्शन देण्यापूर्वी त्यावर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक असल्याची खात्री करावी व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सुलोचने यांनी केले आहे.