मातीवर रेघोट्या ओढणाऱ्या हातात लेखन-पाटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:48 PM2019-11-10T15:48:57+5:302019-11-10T15:49:45+5:30
शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य देत शाळा प्रवेशित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या माय-बापाच्या मागे शेतात दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाºया राहुल व चांदणीच्या हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातून रोजगाराचा शोध घेत खंडाळा शेतशिवारात अनेक कुटुंबे दाखल होत आहेत. यातील दादू जांभेकर यांच्या राहुल व चांदणी या लेकरांना ८ नोव्हेंबर रोजी जि. प. व. प्राथमिक शाळा खंडाळा ता. तेल्हारा येथे प्रवेश देण्यात आला. या प्रवेशप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य देत शाळा प्रवेशित केले.
या सत्रात खंडाळा येथील शाळेत बालरक्षक व ‘सेव्ह बचपन’चे जिल्हा समन्वयक तुलसीदास खिरोडकार व सहकारी शिक्षकांनी पुढाकार घेत दहा शाळकरी शाळाबाह्य मुलांना वयानुरूप प्रवेश मिळवून देत शाळा प्रवाहात आणले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, नितीन सुदालकर जि. प. वरिष्ठ सहायक, जिल्हा समन्वयक प्रशांत अंभोरे, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे यांनी केंद्र शाळा खंडाळाची तपासणी करून शालेय कामकाजाचे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये वाचन आवड निर्माण व्हावी, या हेतूने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वाचनालयाचा शुभारंभ शिक्षणाधिकारी ठग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिनकर धूळ, संतोष वैतकार, ‘सेव्ह बचपन’चे विनोद राठोड, सचिन वावरकार, मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिºहे, कपिल इंगळे व तुलसीदास खिरोडकार यांची उपस्थिती होती.
आतापर्यंत दहा मुलांना दिला प्रवेश!
रोजगारासाठी भटकंती करणाºया मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. राहण्याचे ठिकाण स्थिर नसल्याने या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना वयानुसार शाळेत प्रवेश देण्याची मोहीम बालरक्षक व ‘सेव्ह बचपन’च्यावतीने राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत दहा मुलांना प्रवेश देण्यात आला आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची संधी द्या!
शाळाबाह्य मुलांना शालेय शैक्षणिक प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासनाने शिक्षण विभागासोबत अनेक संस्था कार्यरत आहेत. आपणही आपल्या परिसरात शाळाबाह्य मुलांची दखल घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘सेव्ह बचपन’ या संस्थेसह शिक्षणाधिकारी यांच्याशीही अशा मुलांच्या प्रवेशाबाबत संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.