चुकीच्या बँक खाते क्रमांकामुळे शिष्यवृत्ती मिळेना!
By admin | Published: December 7, 2015 02:30 AM2015-12-07T02:30:51+5:302015-12-07T02:30:51+5:30
बँक खाते क्रमांकामध्ये त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा.
अकोला : ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांंना राष्ट्रीयीकृत बँक खाते क्रमांक देणे अनिवार्य असते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांंनी दिलेल्या बँक खाते क्रमांकामध्ये त्रुटी असल्याने या विद्यार्थ्यांंना अद्यापही शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, या अनुषंगाने संबंधित शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांंचे सुधारित बँक खाते क्रमांक समाजकल्याण विभागाला सादर करण्यासाठी २0 डिसेंबरपर्यंंत मुदत देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांंना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परीक्षा फी शैक्षणिक सत्र २0१0-११ पासून ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे. समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत २0१0-११ ते २0१४-१५ या कालावधीत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. परंतु, यातील अनेक विद्यार्थ्यांंचे खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड चुकीचा असल्याने किंवा इतर चुकांमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. या संदर्भात संबंधित महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही चुकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती मिळावी, या अनुषंगाने संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांंचे खाते क्रमांक दुरुस्ती तसेच शिष्यवृत्ती अर्जातील इतर चुकांची दुरुस्ती करून समाजकल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. यासाठी २0 डिसेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली आहे.