महाडीबीटीबाबत चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

By रवी दामोदर | Published: May 9, 2023 12:35 PM2023-05-09T12:35:33+5:302023-05-09T12:35:46+5:30

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Wrong message about MahaDBT viral on social media | महाडीबीटीबाबत चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

महाडीबीटीबाबत चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

अकोला - कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तसेच ऑनलाइन सोडत ही दि. १५ मे २०२३ पर्यंत असल्याचे व त्यानंतर जवळपास दोन ते तीन महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, असा मजकूर असलेला संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी संपर्क साधला असता व्हायरल होणारा संदेश चुकीचा असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. शंकर किरवे यांनी सांगितले.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या माध्यमातून मिळवता यावा, याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या पोर्टलद्वारे विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही वर्षभर सुरूच असते; मात्र सोशल मीडियावर महाडीबीटी पोर्टलसंदर्भात चुकीचा संदेश फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

महाडीबीटी संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. तसेच महाडीबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे तसेच शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, काही अडचण असल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून, ही प्रक्रिया सतत सुरू असते. सोशल मीडियावर प्रसारित होणारा चुकीचा संदेश तसेच अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. - डॉ. शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

‘महाडीबीटी’वर २४ तास सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टल योजना सुरू केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वयंरोजगार योजना, एकीकृत प्रजनन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदी योजनांचा समावेश आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी २४ तास सेवा उपलब्ध आहे.

Web Title: Wrong message about MahaDBT viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी