विशिष्ट समाज व महापुरुषांबद्दल व्हॉट्स अँपवर आक्षेपार्ह लिखाण!
By admin | Published: September 20, 2016 01:32 AM2016-09-20T01:32:31+5:302016-09-20T01:32:31+5:30
खदान पोलीस ठाण्यात शेकडोंच्या संख्येने जमले समाजबांधव.
अकोला, दि. १९- विशिष्ट समाज आणि थोर महापुरुषांबद्दल व्हॉट्स अँपच्या माध्यमातून अश्लील व बीभत्स लिखाण करून भावना दुखावण्याचे कार्य कापशी येथील एका माथेफिरूने केल्याची बाब सोमवारी रात्री उघडकीस आल्यानंतर, समाजबांधवांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन माथेफिरू इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.
कापशी येथील एका माथेफिरूने व्हॉट्स अँपच्या माध्यमातून विशिष्ट समाजाबद्दल आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत अत्यंत घाणेरड्या भाषेत, अश्लील लिखाण करून अपशब्द वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे समाजबांधव प्रक्षुब्ध झाले. माथेफिरूने वापरलेले अपशब्द पाहून, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय पाटील, संग्राम गावंडे यांच्यासह समाजबांधव पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी माथेफिरू इसमावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्यासोबतही डॉ. पाटील यांनी चर्चा केली. पोलीस उपअधीक्षक माने पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस ठाण्यात युवराज गावंडे, सचिन वाकोडे, नंदकुमार चतरकर डॉ. राजेश काटे, डॉ. अमर भुईभार, संतोष गावंडे, गोपाल काकड, अँड. अनुप देशमुख, अँड. रवीकांत ठाकरे, अँड. राजेश जाधव, अँड. पीयूष देशमुख, अँड. प्रशांत ठाकरे, रूपेश इस्तापे, अमोल राऊत, अँड. हर्षवर्धन पाटील, विकास धोत्रे, राम हलवणे आदी उपस्थित होते.