वैद्यकीय मंडळाने दिला चुकीचा अहवाल
By admin | Published: June 4, 2016 02:18 AM2016-06-04T02:18:59+5:302016-06-04T02:18:59+5:30
पात्र दिव्यांग उमेदवार नोकरीतून ठरला अपात्र!
अकोला: महावितरण अकोला ग्रामीण विभागात विद्युत सहायक पदावर अंकुश बर्वे या अपंग उमेदवाराची नियुक्ती झाली होती; परंतु वैद्यकीय मंडळ अकोलाने अंकुशची शारीरिक क्षमता तपासणी न करता चक्क अपंगत्वाची तपासणी करून त्याला चाळीस टक्क्यांच्या आत अपंग प्रमाणपत्र देऊन त्याला नोकरीत अपात्र ठरविले. वैद्यकीय मंडळ अकोलाच्या चुकीमुळे एका अपंग उमेदवाराचे नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.
अपंग अंकुश बर्वे हा गरीब कुटुंबातील मुलगा असून, तो ५२ टक्के अपंग आहे. तसे त्याच्याकडे अपंग प्रमाणपत्र आहे. त्याची महावितरणमध्ये विद्युत सहायक पदावर नियुक्ती झाली होती; परंतु वैद्यकीय मंडळ अकोलाने त्याची शारीरिक क्षमता तपासणी न करता अपंगत्वाची तपासणी करून चाळीस टक्क्याच्या आत अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले. परिणामी अंकुशवर आता अपंग प्रवर्गात मोडल्या जात नसल्यामुळे नोकरीतून अपात्र ठरण्याची वेळ आली आहे. अंकुशला न्याय मिळावा यासाठी अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना पाठपुरावा करीत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार अपंगाची तपासणी करता येत नाही; परंतु वैद्यकीय मंडळाने त्याची तपासणी करून त्याला नोकरीतून अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला. अंकुशची १0 फेब्रुवारी २0१६ रोजी नियुक्ती झाली.
नियुक्ती होताच नियमानुसार अपंग कर्मचारी काम करण्यास सक्षम आहे किंवा नाही, याची तपाणी व अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना सेवेत रुजू करता येते. यासाठी महावितरणच्या अधिकार्यांनी अंकुशला जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले; परंतु त्यांनी त्याला वैद्यकीय मंडळाकडे पाठविले. वैद्यकीय मंडळाने मात्र त्याला ५२ टक्के अपंग असूनही ४0 टक्क्याच्या आत अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला. असल्याचा आरोप संजय बरडे यांनी केला. पत्रपरिषदेला अंकुश बर्वे, संघटनेचे सचिव मो. अजिज अब्दुल रशिद, कोषाध्यक्ष अविनाश वडतकर, रवींद्र देशमुख, श्याम राऊत, रमेश बेंबरगे, गणेश महल्ले आदी उपस्थित होते.