यशोवर्धन, मंदार करणार जर्मनीत भारताचे प्रतिनिधित्व
By admin | Published: April 18, 2017 12:06 AM2017-04-18T00:06:30+5:302017-04-18T00:06:30+5:30
अकोला : जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जागतिक टेबल-सॉकर स्पर्धा
अकोला : जर्मनी येथील हंबुर्ग शहरात सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धा १६ ते १८ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान जर्मनीचा संघ, तर आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, युक्रेन, अमेरिका व यूके या दिग्गज देशातील खेळाडूंना भारतातील खेळाडू टक्कर देत आहेत.
यशोवर्धन हा अनुभवी खेळाडू असून, यापूर्वी त्याने चीन, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले आहे. मंदार याने आपल्या प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळविले आहे. स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकत्रित प्रो डबल व प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. भारतीय टेबल सॉकर फेडरेशनचे महासचिव मनोज सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील एकूण ९ खेळाडूंचे पथक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना प्रशिक्षक शिवाजी चव्हाण (अकोला) यांचे प्रशिक्षण लाभले आहे. यशोवर्धन जुमळे व मंदार झापे यांनी २ ते ८ जानेवारी रोजी छत्रसाल स्टेडिअम नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय टेबल-सॉकर स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत जागतिक स्पर्धेकरिता स्थान निश्चित केले होते. राष्ट्रीय टेबल सॉकर स्पर्धेचे आयोजन इंडिया टेबल-सॉकर फेडरेशन संलग्न स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडिया व जागतिक टेबल सॉकर फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यशोवर्धन व मंदार यांच्याकडून अकोलेकरांना पदकाची आशा आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजचे संचालक प्रा. नितीन बाठे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, महाराष्ट्र टेबल-सॉकर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जुमळे यांनी दोघांचेही कौतुक करू न विजयाच्या शुभेच्छा दिल्या.