अकोल्याचा यशपाल, धनंजय राज्यात अव्वल
By admin | Published: June 9, 2015 02:37 AM2015-06-09T02:37:31+5:302015-06-09T02:37:31+5:30
प्रत्येकी ९९.४0 टक्के गुण, अकोल्याचाच शर्व रणजित पाटील राज्यात दुसरा
अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. अकोल्यातील बाल शिवाजी हायस्कूलच्या यशपाल पाकळ आणि धनंजय सहस्त्रबुद्धे या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९९.४0 टक्के गुण मिळविले असून, उपलब्ध माहितीनुसार ते राज्यात अव्वल ठरले आहेत. शर्व पाटील ९९.२0 टक्के गुण घेत द्बितीय क्रमांकावर, तर बुलडाण्याचा रोहित अवचार ९९ टक्के गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. शर्व पाटील हा राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा मुलगा आहे. दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याने चमकदार कामगिरी केली. अमरावती विभागाच्या निकालात अकोला जिल्हा बर्यापैकी माघारला. या विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अकोला तिसर्या क्रमांकावर असला तरी, या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी राज्यात बाजी मारली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील बाल शिवाजी हायस्कूलच्या यशपाल पाकळ आणि धनंजय सहस्त्रबुद्धे हे राज्यात अव्वल ठरले. त्याचप्रमाणे अकोल्यातील माऊंट कारमेलचा विद्यार्थी आणि राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा मुलगा शर्व हा राज्यात दुसरा ठरला. तर, जळगाव जिल्ह्याच्या चोपडा येथील पंकज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश काशिनाथ बडगुजर याला ९९.२0 टक्के गुण मिळाले आहेत. अकोला जिल्ह्यातील ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली. मुलींमधून प्रणाली अग्रवाल जिल्ह्यात अव्वल ठरली. तिला ९८.६0 टक्के गुण मिळाले. वाशिम जिल्ह्याने ८९.0४ टक्के निकाल घेऊन, अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला. या जिल्ह्यातील कारंजा येथील जे. डी. चवरे विद्यामंदिरची मयुरी गजानन डाबेराव हिने ९७.८0 टक्के गुण मिळवून मागासवर्गियातून विभागात बाजी मारली. याच शाळेची अनुराधा माणिकचंद बियाणी हिने ९८.६0 टक्के गुण प्राप्त केले आहेत. ती जिल्हयातून अव्वल असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल ठरला. या जिल्ह्याचा ९0.३१ टक्के निकाल लागला आहे. या जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९१.६0 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त, ९४.८७ टक्के निकाल सिंदखेड राजा तालुक्याचा असून, हा तालुका अमरावती विभागातही प्रथम ठरला आहे.
*रूपल, उन्नती आणि ऋतुज नागपूर विभागात अव्वल
नागपूर सोमलवार रामदासपेठ येथील रूपल शर्मा, उन्नती मामुलकर तसेच पंडित बच्छराज व्यास विद्यालयाचा ऋतुज खोबे यांनी ९८.८ टक्के गुण मिळवीत विभागात ह्यटॉपह्ण केले आहे. नागपूर विभागातून ८७.0१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा ४.0८ टक्के यात वाढ झालेली आहे. राज्यातील मंडळांच्या क्रमवारीत विभागाचा शेवटून तिसरा क्रमांक आहे.सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय प्रभारी सचिव अनिल पारधी यांनी निकालाची घोषणा केली. दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून १,८१,६१२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांच्यापैकी १,५८,0२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून ९0,८४१ पैकी ८0,८२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.३४ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८४.७१ टक्के इतके आहे. विभागातून २६,३८९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ५४,६१३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे.