यंदाही केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:09 PM2018-05-28T14:09:02+5:302018-05-28T14:09:02+5:30
अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गतवर्षी केंद्रीय प्रवेश पद्धतीला अकोला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाची २८ मे रोजी सकाळी ११ वाजता रालतो विज्ञान महाविद्यालयात बैठक होणार आहे.
गुणांची स्पर्धा वाढल्यामुळे दर्जेदार व नामांकित महाविद्यालयांमध्ये कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी हजारो रुपये डोनेशन मागितल्या जाते आणि प्रवेशपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट केल्या जाते. राज्यात अनेक ठिकाणी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केल्यामुळे अकोल्यातसुद्धा एनएसयूआय, अभाविपने केंद्रीय प्रवेश पद्धती राबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार गतवर्षीपासून अकोल्यात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आले होते. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. काही शिकवणी वर्ग संचालकांचे कनिष्ठ महाविद्यालये असल्यामुळे आपल्याच शिकवणी वर्गातील मुलांना ते महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास सांगत होते. या प्रवेश पद्धतीमुळे त्यांच्या या प्रकाराला चाप बसला होता. त्यामुळे यंदा ही प्रवेश पद्धती राबवून अकरावी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने मनपा क्षेत्रातील प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली आहे. त्यांनी बैठकीला येताना विहित प्रपत्रामध्ये माहिती भरून आणावी, मुख्याध्यापक, प्राचार्यांनी बैठकीला उपस्थित न राहिल्यास आणि अकरावी विज्ञान प्रवेशाबाबतचे प्रपत्र जमा न केल्यास त्यांची कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेमध्ये नोेंद करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)